वॉशिंग्टन : अमेरिकेत अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी डेमोक्रॅटिक पक्षाची उमेदवारी मिळवत, हिलरी क्लिंटन यांनी नवा इतिहास रचला आहे. एखाद्या प्रमुख पक्षाची उमेदवारी मिळविणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरल्या आहेत. न्यूजर्सी आणि न्यू मॅक्सिको प्रायमरीत निर्णायक विजय मिळविल्यानंतर, हिलरी यांची उमेदवारी निश्चित झाली आहे. न्यूयॉर्कच्या ब्रूकलिनमध्ये आपल्या प्रचार कार्यालयाच्या मुख्यालयात समर्थकांना संबोधित करताना हिलरी (६८) म्हणाल्या की, ‘आपल्या सर्वांचे आभार. आम्ही एक टप्पा पूर्ण केला आहे.’ देशाच्या इतिहासात प्रथमच एखाद्या प्रमुख पक्षाचा उमेदवार महिला आहे. डेमोक्रॅटिक पक्षाची उमेदवारी मिळविण्यासाठी आवश्यक २३८३ प्रतिनिधींचे समर्थन मिळविल्याबद्दल अमेरिकेचे अध्यक्ष ओबामा यांनी हिलरी यांचे अभिनंदन केले आहे. अर्थात, ओबामा यांनी हिलरी यांचे औपचारिक समर्थन केलेले नाही. ।सँडर्स यांना पराभव अमान्य संता मोनिका : डेमोकॅ्रटिकचे एक इच्छुक उमेदवार बर्नी सँडर्स यांनी हिलरी यांच्याकडून झालेला हा पराभव अमान्य केला आहे. त्यांनी प्रतिज्ञा केली आहे की, पक्षाची उमेदवारी मिळविण्याच्या स्पर्धेत आपण कायम टिकून राहणार आहोत. एकीकडे हिलरी यांनी स्वत:ला पक्षाच्या अधिकृत उमेदवार म्हणून जाहीर केलेले असताना, सँडर्स यांनी मात्र अजूनही आशा सोडलेली नाही. वॉशिंग्टन डीसीच्या प्रायमरीत जिंकण्यासाठी आपण सज्ज असल्याचे सँडर्स यांनी म्हटले आहे.
हिलरी क्लिंटन यांनी रचला इतिहास
By admin | Published: June 09, 2016 5:34 AM