मुंबई- 100 वर्षांपुर्वी 67 शब्दांच्या जाहीरनाम्यावर स्वाक्षरी झाली आणि मध्य-पुर्वेतल्या भूगोलावर, इतिहासावर परिणाम करणाऱ्या मोठ्या नाटकाची नांदी सुरु झाली. ही स्वाक्षरी होती ब्रिटिश नेते आर्थर बाल्फर यांची आणि जाहीरनामा होता बाल्फर डिक्लरेशन. पॅलेस्टाईनच्या भूमीमध्ये ज्यू धर्मियांना राहण्यासाठी राष्ट्रीय घरकूल (नॅशनल होम) तयार करण्याची घोषणा यामधून करण्यात आली. 2 नोव्हेंबर 1917 रोजी स्वाक्षरी केलेल्या या पत्राला आज 100 वर्षे पूर्ण झाली आहेत. इंग्लंडच्या पंतप्रधान थेरेसा मे आणि इस्रायलचे पंतप्रधान या निमित्त कार्यक्रमात सहभाग घेत असून ते एकत्र भोजनही घेणार आहेत.
तुर्कस्ताऩातील ऑटोमन साम्राज्याचा भाग असणाऱ्या पॅलेस्टाइनचा ताबा ब्रिटनने मिळवला. 1948 पर्यंत तेथे असणाऱ्या ब्रिटिश मॅंडेटरी रुल संपवून, संयुक्त राष्ट्रातील मतदानानुसार स्वतंत्र नव्या इस्रायल राष्ट्राची निर्मिती तेथे करण्यात आली. बाल्फर डिक्लरेशननंतर या प्रदेशात प्रचंड राजकीय, लष्करी कारवाया आणि युद्धंही झाली. बाल्फर घोषणापत्र या सर्व प्रक्रियेचा आद्य बिंदू म्हणून अनेक तज्ज्ञांनी मत मांडले आहे. इस्रायलने बाल्फर यांच्या नावाने रस्त्यांना नावे किंवा शाळेला नाव दिले असले तरी पॅलेस्टाइनने मात्र आजही त्यांना माफ केलेले नाही. बाल्फर यांच्याबाबत आजही पॅलेस्टाइन नागरिकांच्या मनात प्रतिकूल मत आहे.
आर्थर बाल्फर यांचा जन्म 25 जुलै 1848 साली स्कॉटलंडमध्ये झाला. 1886 साली सेक्रेटरी ऑफ स्कॉटलंड पदावरुन राजकीय कारकिर्द त्यांनी सुरु केली. चिफ सेक्रेटरी ऑफ आयर्लंड, कॉन्झर्वटिव पक्षाचे अध्यक्ष, विरोधी पक्षनेते पद, परराष्ट्रमंत्री अशी एकेक पदे त्यांना मिळत गेली. 1902 ते 1905 या कालावधीत ते इंग्लंडचे पंतप्रधानही होते. जाहीरनामा प्रसिद्ध करताना बाल्फर परराष्ट्रमंत्री (फॉरेन सेक्रेटरी) पदावरती होते. हा जाहीरनामा म्हणजे ज्यू धर्मियांचे तेव्हाचे नेते लिओनेल वॉल्टर रॉटशिल्ड यांना लिहिलेले एक आश्वासनपत्रच होते. या पत्रातील शब्दांची रचना तत्कालीन कॅबिनेट सेक्रेटरी आणि कॉन्झर्वेटिव पक्षाचे खासदार लिओ अॅम्रे यांनी केली होती.
मात्र ब्रिटिशांनी आपल्या ब्रिटनच्या बाहेरील भूमिबाबत केलेल्या या जाहीरनाम्याला पॅलेस्टाईनचे नागरिक कदापिही मंजूरी देणे शक्य नव्हते. तसेच स्थानिक पॅलेस्टाइनी नागरिक बहुसंख्येने असणाऱ्या प्रदेशावर असा निर्णय लादणेही त्यांना आवडले नाही. 1948 साली 7.50 लाख पॅलेस्टाईन नागरिकांना आपली भूमी सोडून जावे लागले. याला "नाकबा" असे म्हटले जाते. त्यासाठीही या घोषणापत्राला दोषी धरले जाते.
डिक्लरेशनमध्ये बाल्फर काय म्हणतात ?"पॅलेस्टाइनमध्ये ज्यूं चे राष्ट्रीय घरकूल (नॅशनल होम) तयार व्हावे या मताचे सरकार (ब्रिटिश) आहे. त्याचवेळेस तेथील ज्यूंव्यतिरिक्त इतर धर्मियांच्या सध्याच्या नागरी आणि धार्मिक अधिकारांबात कोणत्याही पूर्वग्रहाविना कोणतेही काम केले जाणार नाही याची काळजी घेतली जाईल."
पंतप्रधानांच्या दौऱ्यामुळे भारत- इस्रायल संबंध दृढतेच्या दिशेने