बर्लिन (जर्मनी) : जर्मन संसदेबाहेर हिटलर अभिवादन (उजवा हात मानेपासून नजरेसमोर ताठ अवस्थेत ठेवणे) करीत असल्याबद्दल पोलिसांनी दोन चिनी पर्यटकांना ताब्यात घेतले. ३६ व ४९ अशी या दोघांची वये असून त्यांनी त्यांच्या खासगी छायाचित्र संग्रहासाठी हिटलर अभिवादन केले होते.जर्मनीत हिटलर अभिवादन करणे बेकायदा आहे. उजवा हात समोर करून हे दोघे हिटलर अभिवादन करताना छायाचित्र काढून घेत असल्याचे पोलिसांना आढळले. जर्मनीमध्ये कुणाचा द्वेष करणारी भाषणे आणि नाझी राजवटीतील चिन्हे यांच्यासंदर्भात अतिशय कडक कायदे आहेत.या दोघांवरील आरोप सिद्ध झाला तर त्यांना दंड किंवा तीन वर्षे तुरुंगवासाची शिक्षा होईल. राईशटॅग ही इमारत हिटलरचा जेथून उदय झाला त्याचा पुरावा आहे. १९३३ मध्ये ही इमारत आगीत नाहिशी झाली त्यावेळी नाझींनी कम्युनिस्टांना दोषी मानले होते.जर्मनीतून स्वातंत्र्य नाहिसे करण्यासाठी हिटलरने या आगीचे निमित्त पुढे केले. या दोन पर्यटकांना प्रश्न विचारून प्रत्येकाकडून ४५० पौंड सुरक्षा ठेव म्हणून ठेवून घेऊन नंतर त्यांना सोडले. नाझी संघटनेशी संबंधित चिन्हे वा बोधचिन्हांचा वापर जर्मन घटनेचे उल्लंघन ठरते. ते वापरल्याबद्दल या दोघांची फौजदारी चौकशी केली जाईल.
जर्मनीत हिटलर अभिवादन दोन पर्यटकांना पडले महाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2017 1:21 AM