कोरोना महामारीच्या जवळपास ५ वर्षांनंतर चीनला एका नव्या आरोग्य संकटाचा सामना करावा लागत आहे. यावेळी ह्युमन मेटान्यूमोव्हायरस (HMPV) चीनमध्ये वेगाने पसरू लागला आहे. या व्हायरसची प्रकरणं ही केवळ चीनमध्येच नाही तर शेजारील देशांमध्येही नोंदवली जात आहेत. मात्र, आतापर्यंत जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) या व्हायरसच्या प्रादुर्भावाबाबत कोणतेही औपचारिक विधान केलेले नाही. अशा परिस्थितीत अनेक देश आपल्या नागरिकांना खबरदारी घेण्याचा सल्ला देत आहेत.
मलेशियामध्ये एचएमपीव्ही व्हायरसचे काही रुग्ण समोर आल्यानंतर सरकारने तातडीने खबरदारी घेण्याचा सल्ला दिला आहे. स्ट्रेट्स टाईम्समधील वृत्तानुसार, मलेशियाच्या आरोग्य मंत्रालयाने लोकांना या व्हायरसपासून बचाव करण्यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. मंत्रालयाने लोकांना साबणाने वारंवार हात धुवा, मास्क घाला आणि खोकताना किंवा शिंकताना तोंड आणि नाक झाकण्याचा सल्ला दिला आहे.
मलेशियाच्या आरोग्य मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, "लोकांनी गर्दीच्या ठिकाणी विशेष खबरदारी घेतली पाहिजे." चीनच्या शेजारील देश हाँगकाँगमध्येही एचएमपीव्हीचे रुग्ण नोंदवले गेले आहेत. हा व्हायरस प्रामुख्याने श्वसनसंस्थेवर परिणाम करतो आणि त्याची लक्षणं सामान्य सर्दीसारखी असतात. गंभीर प्रकरणांमध्ये, यामुळे ब्राँकायटिस किंवा न्यूमोनिया होऊ शकतो. सर्दी किंवा फ्लू सारख्या लक्षणांसह हा व्हायरस येतो. मुलं आणि वृद्धांमध्ये तो अधिक गंभीर स्वरूप घेऊ शकतो.
एचएमपीव्ही व्हायरस हा नवीन व्हायरस नाही. हा पहिल्यांदा २००१ मध्ये शोधला गेला आणि तेव्हापासून तो वेगवेगळ्या भागात अनेक वेळा पाहिला गेला. हा व्हायरस विशेषतः हिवाळ्यात जास्त एक्टिव्ह असतो. सर्व वयोगटातील लोकांना या व्हायरसची लागण होऊ शकते, मात्र लहान मुलं आणि वृद्धांसाठी तो अधिक धोकादायक ठरू शकतो. तज्ञ सध्या याला महामारीचा धोका म्हणून पाहत नाहीत. पण COVID-19 च्या अनुभवानंतर, HMPV च्या वाढत्या प्रकरणांमुळे सरकार आणि आरोग्य अधिकाऱ्यांची चिंता वाढली आहे.