कराची : पाकिस्तानच्या इतिहासात प्रथमच सिंध प्रांतात ‘होळी’ या हिंदू सणानिमित्त राज्य सरकारने सार्वजनिक सुटी जाहीर केली आहे. पाकिस्तानातील ही एक अभूतपूर्व घटना मानली जात असून, सिंध सरकाने २४ मार्च रोजी सरकारी सुटी राहील, असे जाहीर केले आहे.यापूर्वी ‘होळी’ हा रंगाचा सण साजरा करण्यासाठी केवळ अल्पसंख्याक हिंदूंनाच सुटी दिली जात होती; पण यावेळी प्रथमच सरकारी सुटी जाहीर करण्यात आली असून, ती संपूर्ण प्रांतात सर्वांसाठी असेल, असे मुख्यमंत्र्यांच्या प्रवक्त्याने सांगितले.काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानच्या नॅशनल असेम्ब्लीने होळी, दिवाळी आणि ईस्टर या सणांना सुट्या जाहीर कराव्यात, असा ठराव संमत केला होता; मात्र या ठरावाची अंमलबजावणी बंधनकारक नाही, असे नॅशनल असेम्ब्लीतील हिंदू सदस्य रमेशकुमार वांकवाणी यांनी याबाबतचा प्रस्ताव मांडला होता. ते पाकिस्तान मुस्लिम लीग नवाज गटाचे सदस्य आहेत.होळीला सरकारी सुटी जाहीर करण्याच्या निर्णयाने पाकिस्तानी माध्यमांसह अनेकांनी स्वागत केले आहे. वैचारिकदृष्ट्या देशाला आधुनिकतेकडे नेण्याच्या दृष्टीने टाकण्यात आलेले ते एक पाऊल असल्याचे वर्णन प्रसारमाध्यमांनी केले आहे.पाकिस्तानची लोकसंख्या २० कोटी असून, त्यात केवळ २ टक्के लोक हिंदू आहेत. त्यातील बहुतेक हिंदू सिंध प्रांतात राहतात. ख्रिश्चन नागरिकांची संख्या १.६ टक्के आहे.पाकिस्तानात धार्मिक अल्पसंख्यकांविरुद्ध मोठ्या प्रमाणावर सामाजिक भेदभाव केला जातो; मात्र या धोरणापासून अलग होण्याचे प्रयत्न नवाज शरीफ सरकारने चालविले आहेत. दक्षिण आशियात भारत, नेपाळ या देशांत होळी हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.या देशात धार्मिक अल्पसंख्याकावर मोठे अत्याचार होत असल्याचे आरोप मानवाधिकार संघटनांकडून होत आहेत. या पार्श्वभूमीवर होळीला सुटी देण्याच्या निर्णयाचे स्वागत होत आहे.८६ भारतीय मच्छीमारांची पाकिस्तानकडून सुटकाकराची : पाकिस्तानने आज ८६ भारतीय मच्छीमारांची मुक्तता केली. हे मच्छीमार कथितरीत्या पाकिस्तानच्या सागरी हद्दीत गेले होते. उभय देशात सद्भावना निर्माण करण्याचे प्रयत्न चालू आहेत. त्यानुसार चालू महिन्यात पाकिस्तानने दुसऱ्यांदा भारतीय मच्छीमारांची सुटका केली आहे.कराचीच्या मलीर कारागृहाचे अधीक्षक रझा मुमताज यांनी सांगितले की, हे ८६ मच्छीमार रेल्वेने लाहोरला नेले जातील आणि तेथून वाघा सीमेवरून त्यांना भारतात धाडले जाईल. इदी ट्रस्टने त्याच्या लाहोरपर्यंतच्या प्रवासाची व्यवस्था केली आहे.
पाकिस्तानच्या सिंध प्रांतात प्रथमच होळीची सर्वांसाठीच सरकारी सुटी जाहीर
By admin | Published: March 21, 2016 2:53 AM