वॉशिंग्टन - ब्लू व्हेल, मोमो चॅलेंज यासारख्या गेमच्या आहारी जाऊन लहान मुलांनी आत्महत्या केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यानंतर आता नेटफ्लिक्सवरील मालिका पाहून एका 12 वर्षीय मुलीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जेसिका स्कॅटरसन असं आत्महत्या करणाऱ्या मुलीचं नाव असून अमेरिकेत ही घटना घडली. '13 reasons why' ही नेटफ्लिक्सवरील मालिका पाहून मुलीने गळफास घेतल्याची माहिती समोर येत आहे.
जेसिकाने घरातील बाथरूममध्ये गळफास घेतला. तसेच तिने आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली होती. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करताना ही चिठ्ठी सापडली. यामध्ये तिने आत्महत्येची सहा कारणं लिहिली होती. जेसिकाच्या आईने नेटफ्लिक्सवरील '13 reasons why' मालिका जेसिका पाहत असून त्यानंतर तिच्या वागणुकीत अचानक बदल झाल्याचे सांगितले आहे. त्यामुळेच मालिका पाहून आत्महत्या केल्याचा संशय तिच्या आईनेही व्यक्त केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जेसिका तिच्या शाळेतील मित्रांमुळे तणावात होती आणि ही मालिका पाहून तिच्याकडे आत्महत्येचा एकच पर्याय दिसत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
जेसिकाच्या खोलीमध्ये आत्महत्या करणाऱ्या एका मुलीचा फोटोही आढळला आहे. तसेच तिच्या हातावर ब्लेडने केलेले काही वारही आढळले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राने याबाबतचे वृत्त दिले आहे. '13 Reasons Why' ही एक अमेरिकेतील मालिका आहे. ज्यामध्ये तरुण-तरुणींमधील नैराश्य आणि त्यांच्या आत्महत्या यासंदर्भातील गोष्टींचा समावेश आहे. मालिकेमुळे याआधीही अनेकदा वाद निर्माण झाला आहे. तसेच मालिकेविरोधात तक्रारही दाखल करण्यात आली होती.
नेटफ्लिक्सवरील या मालिकेमध्ये एका मुलीवर झालेल्या बलात्काराची गोष्ट दाखवण्यात आली होती. त्यावेळी दाखवण्यात आलेल्या अनेक दृष्यांवर लोकांनी आक्षेप घेतला होता. तसेच ही मालिका बंद करण्याची देखील मागणी देखील केली होती. मात्र त्यानंतर आता 12 वर्षीय जेसिकाने ही मालिका पाहून आत्महत्या केल्याची आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. '13 reasons why' ही मालिका पाहून आतापर्यंत 6 जणांनी आत्महत्या केली आहे.