पाकिस्तानचे गृहमंत्री शेख रशीद यांना पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांनी युएईहून माघारी बोलावले आहे. रशीद यांना पाकिस्तानमध्ये उद्भवलेल्या सध्याच्या हिंसात्मक परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी बोलविण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
रशीद टी-२० वर्ल्डकपमध्ये आज होणारा भारत-पाकिस्तान सामना (India Vs Pakistan Match) पाहण्यासाठी युएईला गेले होते. मात्र, शनिवारी रात्रीच त्यांना पुन्हा पाकिस्तानला यावे लागले. वृत्तसंस्था एएनआयने पाकिस्तानी न्यूज चॅनल जिओ न्यूजच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे.
पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान मोठा मोठा दावा करतात. मात्र, इस्लामाबादमध्ये सारे काही ठीक नाहीय. यामुळेच सध्याच्या असुरक्षित स्थितीवर मात करण्यासाठी इम्रान यांनी राशिद यांना लगेचच माघारी बोलावले आहे. कट्टरपंथी संघटना तहरीर ए लब्बैक पाकिस्तान (टीएलपी) ने त्यांचा प्रमुख हाफिज हुसैन रिजवीला नजरकैदेत ठेवल्याविरोधात इस्लामाबादमध्ये मोठे आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. शेख रशीद यांनी मॅच पहायला जाण्याआधी इम्रान खान यांची परवानगी घेतली होती. मात्र, परिस्थिती एवढी झपाट्याने बदलली की त्यांना दुबईत पोहोचत नाहीत तोच पुन्हा मागे बोलविण्यात आले.
टीएलपीचा हा मार्च रोखण्यासाठी पाकिस्तानने निमलष्करी दलांना पाचारण केले आहे. 500 हून अधिक जवान आणि 1000 फ्रंटीयर जवानांना तैनात केले आहे. टीएलपीने शांततेत मार्च काढण्याची घोषणा केली होती. जर आम्हाला त्यापासून रोखण्यात आले तर प्लान बी देखील तयार आहे, असे ते म्हणाले. हाफिज हुसैन रिजवीला पंजाब सरकारने 12 एप्रिलपासून नजरकैदेत ठेवले आहे. सरकारने काही दिवसांपूर्वीच टीएलपीसोबत चर्चा केली होती. मात्र, त्यातून काही निष्पन्न झालेल नाही.