हॉँगकॉँग - लोकशाहीचं समर्थन करणाऱ्या 22 वर्षीय युवा नेता जोशुआ वॉन्ग हॉन्गला अखेर चीनने सरकारने दडपशाहीने अटक केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हॉंगकॉंगमध्ये जोशुआच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने तरूण वर्ग हॉंगकॉंग प्रशासन आणि चीन सरकारविरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहे. या आंदोलनामुळे पहिल्यांदाच 22 वर्षीय जोशुआ या तरूणाने चीन सरकारला जेरीस आणलं आहे. जोशुआसोबत आणखी 3 जणांना अटक करण्यात आली आहे.
हॉंगकॉंग प्रशासनाने एक विधेयक आणलं होतं. या विधेयकात जर कोणी व्यक्ती सरकार अथवा प्रशासनाविरोधात आंदोलन करत असेल तर त्याला चीनमध्ये आणून त्याच्यावर खटला चालविण्यात येईल असं नमूद केलं होतं. त्यामुळे या विधेयकाचा विरोध करण्यासाठी वॉन्ग याने समर्थकासोबत रस्त्यावर उतरुन संघर्ष सुरु केला होता. जून महिन्यापासून जोशुआ वॉन्ग आणि त्याचे समर्थक सरकारविरोधात निर्दशने करत होते.
हॉंगकॉंगच्या रस्त्यावर लाखो लोकं या विधेयकाचा निषेध करत आंदोलन करत होते. या आंदोलनाचा परिणाम हॉंगकॉंगच्या विमानसेवेवरही झाला होता. युवा आंदोलनकर्त्यांनी महाशक्तिशाली चीनसारख्या देशाच्या नाकात दम आणला. मुख्यत: या सगळ्या आंदोलनकर्त्यांचा नेता हा 22 वर्षीय जोशुआ वॉन्ग ची-फंग हा आहे. इतकचं नाही तर त्याच्या पक्षातील सर्वाधिक नेते 20-25 वयोगटातील आहे.
हॉंगकॉंगमध्ये लोकशाही बळकट करण्यासाठी आंदोलन करणारा जोशुआला 2014 मध्येही अटक करण्यात आलं होतं. त्यावेळी शहरातील बहुतांश भागात 79 दिवस कामकाज ठप्प होतं. जूनमध्येही वॉन्गला 5 आठवड्यांसाठी कैद केलं होतं त्यानंतर त्याची सुटका करण्यात आली होती. कोर्टाच्या मानहानी प्रकरणात जोशुआ वॉन्गवर गुन्हा नोंदविण्यात आला होता. वॉंन्ग यांच्या डेमोसिस्टो पक्षाने त्यांच्या ट्विटरवर सांगितलं आहे की, एका गल्लीत त्यांना अचानक खाजगी कारमध्ये बसविण्यात आलं. त्यानंतर त्यांना पोलीस मुख्यालयात घेऊन जाण्यात आलं.
जोशुआ वॉंन्ग यांच्यासोबत डेमोसिस्टो पक्षाचे सदस्य ऐग्नेस चाउ यांनाही अटक केली आहे. पक्षाचे सदस्य चाउ यांच्यावर कोणता गुन्हा दाखल करण्यात आला आहे याची माहिती नाही. त्याचसोबत लोकशाहीचं समर्थन करणाऱ्या हॉंगकॉंग नॅशनल पार्टीचे संस्थापक ऐंडी चान यांनाही ताब्यात घेण्यात आलं आहे. चान यांना गुरूवारी रात्री आंतरराष्ट्रीय विमानतळावरून ताब्यात घेण्यात आलं आहे.
कोण आहे जोशुआ वॉंन्ग?जोशुआ वॉन्ग ची-फंग हॉंगकॉंगमध्ये लोकशाही स्थापन करण्यासाठी उभारण्यात आलेल्या डेमोसिस्टो पक्षाचे महासचिव आहे. राजकारणात येण्याआधी त्यांनी स्टूडेंट ग्रुप स्कॉलरिजमची स्थापना केली होती. वॉन्ग 2014 मध्ये देशात आंदोलन केल्यानंतर जगभरात प्रसिद्ध झाले होते. टाइम या पत्रिकेनेही 2014 मध्ये सर्वात प्रभावी युवा म्हणून गौरव केला आहे. 2018 मध्ये त्यांचे नोबेल पीस प्राइज यामध्ये नामांकन करण्यात आले होते.