हाँगकाँग : शहराचे मुख्य कार्यकारी अधिकारी लियुंग चुन यिंग यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी शांततापूर्ण पद्धतीने आंदोलन करत असलेले लोकशाहीवादी विद्यार्थी सरकारशी चर्चा करण्यास राजी झाले असले तरी त्यांनी आपली निदर्शने सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. दुसरीकडे लियुंग चुन यिंग यांनी राजीनामा देण्यास नकार दिला आहे.
निदर्शकांच्या धरणो आंदोलनादरम्यान शहराचे मध्यवर्ती भाग संपूर्ण आठवडाभर बंद राहिले. मुख्य कार्यकारी अधिकारी यिंग यांचा राजीनामा आणि लोकशाही स्थापन करण्याच्या मागणीसाठी निदर्शकांनी काल मध्यरात्रीर्पयतची मुदत दिली होती. लियुंग यांच्या कार्यालयाला हजारो निदर्शकांनी घेराव घातला आहे. निदर्शक व पोलिसांतील तणाव वाढला आहे. मध्यरात्रीपूर्वी लियुंग निदर्शकांना सामोरे गेले. कोंडी संपुष्टात आणण्यासाठी त्यांनी एका प्रमुख विद्यार्थी संघटनेशी चर्चेची तयारी दर्शविली. मी राजीनामा देणार नाही, कारण मला निवडणुकीर्पयत आपले काम सुरू ठेवायचे आहे, असे लियुंग म्हणाले. (वृत्तसंस्था)
दोन दिवसांच्या सार्वजनिक सुटीनंतर हाँगकाँगमध्ये शुक्रवारपासून कामकाज पूर्ववत होईल, असे वाटत होते; मात्र शहरात सर्वत्र निदर्शक विखुरलेले आहेत. हाँगकाँग फेडरेशन ऑफ स्टुडंट्सोबत चर्चा करण्यासाठी मुख्य प्रशासकीय सचिव केरी लाम यांची आपण नियुक्ती करत असल्याची घोषणा लियुंग यांनी केली. आपण लाम यांची भेट घेऊ; मात्र लियुंग यांनी राजीनामा न दिल्यास आंदोलन सुरूच ठेवण्यात येईल, असा इशारा हाँगकाँग फेडरेशन ऑफ स्टुडंटस्ने दिला आहे. (वृत्तसंस्था)