चीनची कम्युनिस्ट पार्टी (CPC) पुन्हा एकदा देशाची धुरा क्षी जिनपिंग यांच्याकडे सोपवणार आहे. सीपीसीच्या 20 व्या अधिवेशनासाठी बीजिंगमध्ये पक्षाचे सदस्य एकत्र येत आहेत. 16 ऑक्टोबर ते 22 ऑक्टोबरपर्यंत ही बैठक चालणार आहे. यादरम्यान क्षी जिनपिंग यांनी पक्षाच्या सदस्यांना संबोधित केले. “चीनने मानवी इतिहासातील गरिबीविरुद्धची सर्वात मोठी आणि प्रदीर्घ लढाई लढली आहे. जगभरातील गरिबी कमी करण्यासाठी आमचे प्रयत्न महत्त्वाचे आहेत,” असे ते म्हणाले. यावेळी चीनच्या राष्ट्राध्यक्षांनी तैवानचाही उल्लेख केला.
नव्या युगात पक्ष आणि देशाला पुढे नेण्यासाठी आम्ही ठोस रणनीती तयार केली आहे. आम्ही प्रबळ राजकीय इच्छाशक्तीने राजकीय सुधारणा मजबूत केल्या आहेत, ज्याचे परिणाम अनेक क्षेत्रांत दिसून येत असल्याचे जिनपिंग म्हणाले. क्षी जिनपिंग यांनी सुरुवातीच्या भाषणात कम्युनिस्ट पक्षाच्या राजवटीची प्रशंसा केली. "आमच्याकडे जगातील सर्वात मोठ्या शैक्षणिक आणि आरोग्य सुविधा आहेत,” असे ते म्हणाले. याशिवाय जिनपिंग यांनी आपल्या कोविड धोरणाचा बचाव केला. "आम्ही लोकांच्या सुरक्षिततेचे आणि आरोग्याचे सर्वोच्च पातळीवर संरक्षण केले आहे. महासाथीच्या काळात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे लोकांचे जीवन,” असेही त्यांनी नमूद केले.
तैवानला सोबत घेणार“तैवानच्या स्वातंत्र्याचे रक्षण करण्यासाठी आणि त्यात अन्य देशांचा हस्तक्षेप नाकारण्यासाठी आम्ही कठोर पावले उचलली आहेत. आम्ही तैवान आमचा मानतो आणि तो आमच्यासोबत सामील करू. आंतरराष्ट्रीय न्याय व्यवस्था निर्माण करण्यासाठी मानव-केंद्रित सर्वांगीण विकासाला बळकटी देण्यात आली आहे,” असे जिनपिंग म्हणाले. “पक्षातील कुरबुरी दूर करण्यासाठी आम्ही काही लोकांवर कारवाई केली आहे. काही लोकांना वाचवण्यासाठी देशातील १४० कोटी जनतेवर अन्याय होऊ देऊ शकत नाही. पक्षांतर्गत, लोकांमध्ये आणि लष्करांत छुपे धोके असू शकतात, हे आपण नेहमी लक्षात ठेवले पाहिजे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.