हाँगकाँग : गेल्या आठवड्यात लोकशाहीवादी निदर्शकांवर हल्ले करणाऱ्या ‘ट्रियाड’ टोळ्यांच्या विरोधात हाँगकाँगवासीयांनी शनिवारी पोलिसांची बंदी झुगारून जोरदार निदर्शने केली. या आंदोलनात हजारो लोक सहभागी झाले. शहरात मिरवणूक काढून नंतर आंदोलन चीन सीमेजवळ गेले.गेल्या रविवारी यूएन लाँग स्टेशनजवळ सरकारविरोधात निदर्शने करणा-या लोकशाहीवादी आंदोलकांवर एका ट्रियाड टोळीने हल्ला केला होता. पांढरे टीशर्ट घातलेल्या हल्लेखोरांकडे लाठ्या-काठ्या आणि पाईप होते. त्यांच्या हल्ल्यात ४५ लोक गंभीर जखमी झाले होते. जखमींना रुग्णालयात दाखल करावे लागले होते. चीनच्या मुख्य भूमीला प्रत्यार्पणाची परवानगी देणाºया एका विधेयकामुळे हाँगकाँगमध्ये सध्याचा तणाव निर्माण झाला आहे. हाँगकाँग सरकार चीनसमर्थक असून, लोक त्याला विरोध करीत आहेत.गेल्या रविवारी लोकशाहीवादी निदर्शकांवर हल्ला करणाºया संघटित ट्रियाड टोळीतील आरोपींविरोधात पोलीस कारवाई करायला तयार नसल्यामुळे लोक आणखी संतापले आहेत. सरकारसमर्थक हल्लेखोर झुंडींकडे पोलीस मुद्दाम कानाडोळा करीत असल्याचा आरोप होत आहे. त्याविरुद्ध हाँगकाँगवासीयांनी निदर्शनांचे आयोजन केले होते. निदर्शकांकडून शेजारच्या गावकऱ्यांवर हल्ले होऊ शकतात, असे कारण देऊन पोलिसांनी या निदर्शनांना परवानगी नाकारली होती. (वृत्तसंस्था)
ट्रियाड टोळ्यांच्या विरोधात ‘हाँगकाँग’वासी रस्त्यावर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2019 6:16 AM