कोरोनाने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. जगभरातील अनेक प्रगत देश कोरोनाच्या महाभयंकर संकटाचा सामना करत असून व्हायरस पुढे हतबल झाले आहेत. रुग्णसंख्येने तब्बल 24 कोटींचा टप्पा पार केला असून एकूण रुग्णांची संख्या 243,397,606 वर पोहोचली आहे. तर 4,947,807 जणांचा मृत्यू झाला आहे. याच दरम्यान जगात आणखी एका व्हायरसने शिरकाव केल्याची माहिती आता समोर आली आहे. हाँगकाँगमध्ये एका रहस्यमय आजराची साथ पसरली आहे. बॅक्टेरियल इन्फेक्शनमुळे आतापर्यंत सात जणांचा मृत्यू झाला आहे. या सात जणांच्या मृत्यूनंतर स्थानिक प्रशासनाने लोकांना सी फूडसंदर्भात सतर्कतेचा इशारा दिला आहे.
हाँगकाँगमधील वेट मार्केट्सने दिलेल्या माहितीनुसार, माशांसंबंधीत हे बॅक्टेरियल इन्फेक्शन असल्याचं म्हटलं आहे. मासळी बाजारांमध्ये मोठ्या प्रमाणात माशांची खरेदी विक्री होते. याच ठिकाणाहून बॅक्टेरियल इन्फेक्शनचा प्रसार झाला आहे. यामध्ये सात जणांचा मृत्यू झाला आहे. सेंटर फॉर हेल्थ प्रोटेक्शन या हाँगकाँगमधील आरोग्य विषय संस्थेने गुरुवारी ज्या व्हायरसमुळे सात जणांचा मृत्यू झाला आहे तो व्हायरस कोणता आहे याबद्दल खुलासा केला जात असल्याचं म्हटलं आहे.
तज्ज्ञांनी लोकांना सी फूड न खाण्याचं केलं आवाहन
लोकांमध्ये ST283 स्ट्रेनच्या बॅक्टेरियाचा संसर्ग झाला होता असं सीएचपीने स्पष्ट केलं आहे. तसेच हा संसर्ग एकूण 32 जणांना झाला आहे. माशांच्या माध्यमातून हा संसर्ग झाल्याची शक्यता असल्याने संसर्ग झालेल्या व्यक्तींच्या शरीरात या व्हायरसने कसा शिरकाव केला याचा तपास केला जात आहे. संसर्ग झालेल्यांपैकी अनेकजण हे मासेमारी करणारे असून ते साध्या हातांनी मासे हाताळायचे. काहीजण तर जखमा असतानाही मासे हाताळत असल्याने तिथून संसर्ग झाल्याची शक्यता सीएचपीने व्यक्त केली आहे. यामुळेच तज्ज्ञांनी लोकांना काही वेळ सी फूड न खाण्याचं आवाहन केलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.