न्यूयॉर्क : बाळाला दुग्धपान करताना मातेच्या शरीरात दूध तयार होण्यासाठी जे हार्मोन स्रवते त्यामुळे पती-पत्नीतील प्रेमही अधिक वाढीस लागते असा नव्या संशोधनाचा निष्कर्ष आहे. आॅनलाईन जर्नल प्लोज वन मध्ये हे निष्कर्ष प्रसिद्ध झाले आहेत. मातेला दुधाचा पाझर फोडण्यासाठी प्रोलेक्टिन नावाचे हार्मोन कार्यरत होते. यामुळे पती-पत्नीतील आकर्षणही वाढते व ते एकमेकांच्या आलिंगनात बद्ध होतात असा नवा निष्कर्ष आहे. निष्कर्षासाठी कोलंबिया येथील टॅमरीन नावाच्या माकडांच्या लघवीवर प्रयोग केले. ही माकडेही एकाच व्यक्तीशी संबंध ठेवतात व मुलांची काळजी आई-वडील घेतात. हे वागणे माणसासारखे असल्याने या माकडावर प्रयोग करण्यात आले. माकडाच्या ज्या मादीत प्रोलेक्टिन या हार्मोनचे प्रमाण जास्त असते, त्या नर-मादीचे लैंगिक संबंधांचे प्रमाण वाढते, तसेच परस्परांना आलिंगन देण्याचे प्रमाणही वाढते असे निदर्शनास आले आहे. प्रोलेक्टिन संदर्भातील आणखी एका चाचणीत जे पुरुष आपल्या अपत्याची देखभाल करतात, त्यांच्या शरीरात जास्त प्रोलेक्टिन तयार होते असे निदर्शनास आले आहे. प्रोलेक्टिनचा संबंध पालकत्वाशी असावा असा निष्कर्ष काढण्यात आला; पण स्नोडॉन यांच्या मते पालकत्व हा प्रोलेक्टिनचा एक गुण आहे. (वृत्तसंस्था)
‘त्या’ हार्मोनमुळे वाढते पती-पत्नीतील प्रेम
By admin | Published: April 01, 2015 1:36 AM