एखादा व्हेंटिलेटरवर असेल तर त्याचा जीव वाचविण्यासाठी डॉक्टर आणि तो बरा होण्यासाठी कुटुंबीय, मित्र प्रयत्न करत असतात. परंतू जर्मनीमध्ये धक्कादायक प्रकार घडला आहे. व्हेंटिलेटरवर असणाऱ्या रुग्णाचा व्हेंटिलेटर एका वृद्धाने दोनदा बंद केल्याचा प्रकार घडला आहे. त्यामागचे कारण तर त्याहून धक्कादायक आहे.
या ७२ वर्षीय महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. तिची रुममेट हॉस्पिटलमध्ये व्हेंटलेटरवर होती. त्या व्हेंटिलेटरचा आवाज होत असल्याने या वृद्ध महिलेने तो बंद केला होता. गार्डियनने दिलेल्या वृत्तानुसार ही घटना २९ नोव्हेंबरच्या सायंकाळी जर्मनीच्या मॅनहेममध्ये घडली आहे.
यानंतर हॉस्पिटल प्रशासनात खळबळ उडाली होती. या 72 वर्षीय महिलेला हत्येचा प्रयत्न केल्याच्या संशयावरून ताब्यात घेण्यात आले आहे. या महिलेने पहिल्यांदा व्हेंटिलेटर बंद केला होता, तेव्हा नर्सने तिला तसे करू नका, ती मशीन रुग्णासाठी खूप महत्वाची आहे असे सांगितले होते. परंतू त्यानंतरही त्या महिलेने पुन्हा मशीन बंद केली.
हॉस्पिटलने पोलिसांना सांगितल्यानुसार रुग्ण धोक्याबाहेर आहे तरीसुद्धा त्याला अतिदक्षतेची गरज आहे. व्हेंटिलेटर काढल्याने त्याला पुन्हा तेवढे रिकव्हर व्हायला वेळ लागणार आहे. महिलेला बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आले. यानंतर तिला तुरुंगात पाठविण्यात आले.