बीजिंग: चीनमधील दफनभूमी, तसेच वैद्यकीय प्रयोगशाळांतून चार हजारांहून अधिक मृतदेह चोरून त्यातील हाडे विकण्यात आली आहेत. दंत प्रत्यारोपणासाठी ही हाडे वापरण्यात येतात. त्या देशातील यंत्रणांनी केलेल्या तपासातून ही धक्कादायक माहिती उघड झाली आहे.
सर्वसाधारणपणे हिप रिप्लेसमेंटची शस्त्रक्रिया होणाऱ्या रुग्णांच्या संमतीने त्यांची हाडे प्रत्यारोपणासाठी घेतली जातात. चीनमधील दफनभूमीतून मृतदेह चोरीला जात असल्याच्या अनेक तक्रारी पोलिसांत दाखल होतात. त्यातील काही प्रकरणांचा छडा लावला जातो. मृतदेहांतील हाडांचा व्यापार करून, त्याद्वारे अनेक लोक सधन झाले आहेत. ही सर्व गैरकृत्ये करणाऱ्या संघटित टोळ्यांशी पोलिसांचेही संगनमत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. दफनभूमीतील कर्मचारीही या गैरकृत्यांत सामील असल्याचे आढळून आले. शांक्सी प्रांतातील तैअुयान पोलिसांनी या गुन्ह्यांत काही जणांना अटक केली आहे. (वृत्तसंस्था)
१८ टन मानवी हाडे जप्त
चीनमधील काही टोळ्या मृतदेह चोरून त्यातील हाडांची विक्री करत असल्याची बाब शांक्सी प्रांतातील तैअुयान येथील पोलिसांनी केलेल्या तपासात उघड झाली. त्यातून या टोळ्या खूप पैसे मिळवत आहेत. पोलिसांनी सुमारे १८ टन मानवी हाडे व त्यापासून बनविलेली ३५ हजार उत्पादने नुकतीच जप्त केली.