कराची : बलुचिस्तान प्रांतात सरकारी रुग्णालयावर तालिबानने सोमवारी केलेल्या हल्ल्यात ७० ठार, तर १०० हून अधिक लोक जखमी झाले. मृत आणि जखमींपैकी बहुतांश लोक वकील असून, दोन पत्रकारांचाही मृतांत समावेश आहे. हल्लेखोरांनी आधी आत्मघाती बॉम्बस्फोट आणि त्यानंतर अंदाधुंद गोळीबार करीत रुग्णालयाला लक्ष्य केले. आज सकाळी हत्या करण्यात आलेले बार असोसिएशनचे अध्यक्ष बिलाल अन्वर कसी यांचा मृतदेह रुग्णालयात आणण्यात आला होता. त्यांच्या मृत्यूने दु:खी झालेले वकील तिथे पोहोचले. त्यांचा मृतदेह अपघात विभागात होता. तेथेच भीषण स्फोट घडवून आणण्यात आला. स्फोटानंतर गोळीबार करण्यात आला. पोलिसांनी हा आत्मघाती हल्ला असल्याचे व त्यासाठी आठ किलो स्फोटकांचा वापर करण्यात आल्याचे सांगितले. हल्लेखोराने स्फोटके त्याच्या शरीराला बांधली असावीत.
पाकमध्ये रुग्णालयात स्फोट, ७० जण ठार
By admin | Published: August 09, 2016 4:36 AM