थिम्पू : भारताच्या सहकार्याने येथे उभारण्यात आलेल्या आधुनिक रुग्णालयाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भूतानचे त्यांचे समपदस्थ शेरिंग टोबगे यांनी शनिवारी उद्घाटन केले. हे रुग्णालय महिला आणि बालकांना दर्जेदार आरोग्य सुविधा पुरवेल. ‘ग्यालत्सुएन जेत्सुन पेमा वांगचुक माता व बाल रुग्णालय’ हे १५० खाटांचे आधुनिक सुविधांनी युक्त रुग्णालय असून, ते भारताच्या सहायाने थिम्पू येथे उभारण्यात आले. ग्यालत्सुएन जेत्सुन पेमा वांगचुक माता आणि बाल रुग्णालयाचे आज उद्घाटन केले. दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध असलेले हे रुग्णालय अनेक कुटुंबांसाठी आशेचा किरण आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हटले आहे. हे रुग्णालय निरोगी भावी पिढीच्या संगोपनाप्रतीच्या बांधिलकीचे प्रतीक आहे. आधुनिक सुविधांनी सुसज्ज असलेले हे रुग्णालय भारत-भूतान विकास सहकार्याचे ज्वलंत उदाहरण आहे. असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हटले आहे. (वृत्तसंस्था)
अनेक सुविधा उपलब्ध- या रुग्णालयाचे दोन टप्प्यांत बांधकाम करण्यात आले. भारताने पहिल्या टप्प्यासाठी २२ कोटी रुपयांचे अर्थसहाय दिले. दुसऱ्या टप्प्यासाठी भारताने १२ व्या पंचवार्षिक योजनेंतर्गत ११९ कोटी रुपयांची तरतूद केली. - २०१९ मध्ये सुरू झालेले या रुग्णालयाचे बांधकाम नुकतेच पूर्ण झाले आहे. इथे बालरोग, स्त्रीरोग, प्रसूती, भूलशास्त्र, शस्त्रक्रियागार, नवजात शिशु अतिदक्षता व बालरोग अतिदक्षता यासारख्या आधुनिक सुविधा असतील.