ओक्लाहोमा (अमेरिका) : टेक्सास प्रांतातील एका शाळेतील गोळीबाराच्या घटनेने अमेरिका हादरलेली असतानाच बुधवारी टुल्सा येथील इस्पितळ संकुलातील एका इमारतीत गोळीबाराची भयानक घटना घडली. यात दाेन डाॅक्टर, एक रुग्ण आणि एक रिसेप्शनिस्ट यांचा मृत्यू झाला. हल्लेखोराने रायफल आणि बंदुकीने बेछूट गोळीबार केला. टुल्साचे पोलीस उपप्रमुख इरिक डल्गेईश यांनी सांगितले की, हल्लेखोराचा मृत्यू झाला. स्वत:च्याच बंदुकीची गोळी लागल्याने जखमी होऊन हल्लेखोराचा मृत्यू झाला.
हल्लेखोराची ओळख पटलेली नाही. अमेरिकेत गोळीबाराच्या घटना वारंवार घडत आहेत. मंगळवारी न्यू ऑरलियन्स येथील पदवीदान सोहळ्यात करण्यात आलेल्या गोळीबारात एक महिला ठार झाली होती. त्याआधी टेक्सास राज्यातील एका शाळेतील भयानक गोळीबारात १९ विद्यार्थी आणि दोन शिक्षक ठार झाले होते. या घटनांमुळे अमेरिकेतील बंदूक संस्कृतीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
द गन व्हायलन्स अर्काईव्ह या स्वयंसेवी संस्थेनुसार अमेरिकेत २०२२मध्ये आतापर्यंत अशा सामूहिक हत्याकांड घडविणाऱ्या गोळीबाराच्या २३२ घटना घडल्या आहेत. यावर्षी अमेरिकेतील शाळांमधील गोळीबाराच्या २७ घटना घडल्या. अमेरिकेत सरासरी नऊ मुलांचा गोळीबाराच्या घटनांत मृृत्यू होतो; म्हणजे दर २ तास ३६ मिनिटाला एका मुलाचा गोळीबारात मृत्यू होतो. अमेरिकेती गन लॉबी खूप मजबूत असल्याचे बराक ओबामा यांनी म्हटले होते. तर या मुद्द्यावरुन जाे बायडेन आणि डाेनाल्ड ट्रम्प हेदेखील आमनेसामने आले आहेत. (वृत्तसंस्था)
अलीकडच्या काही घटना...
२४ मे : टेक्सास प्रांतातील एका शाळेतील गोळीबारात १९ मुले आणि दोन शिक्षकांचा मृत्यू.१५ मे : कॅलिफोर्नियात बंदूकधारी हल्लेखोराने केलेल्या हल्ल्यात लगुना वूड्समधील चर्चचे चार सदस्य जखमी झाले होते, तर हल्लेखोर ठार झाला होता.१३ मे : मिलवॉकी येथील गोळीबारात १६ जखमी.