नवी दिल्ली: अफगाणिस्तानातील खोस्त येथील स्थानिक हॉटेलवर आज हल्ला झाल्याचे वृत्त आहे. या हल्ल्यात तीन जणांचा मृत्यू झाला असून ७ जण जखमी झाले आहेत. हॉटेलला लक्ष्य करून हवाई हल्ला करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
पाकिस्तानी तालिबानच्या हाफिज गुल बहादूर गटाचे काहीजण अनेकदा या हॉटेलमध्ये येत होते. सुरुवातीच्या अहवालात फायटर ग्रुपच्या अनेक सैनिकांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. दोन्ही बाजूंच्या अधिकाऱ्यांनी याला दुजोरा दिला आहे. मात्र, आतापर्यंत या हल्ल्याची जबाबदारी कोणीही स्वीकारलेली नाही.
हा हल्ला अशावेळी करण्यात आला आहे जेव्हा तालिबानने एक दिवस आधीच अफगाणिस्तानात परतल्याचा दोन वर्षांचा वर्धापन दिन साजरा केला आहे. २०२१मध्ये तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यापासून, राजधानी काबूलमध्ये बॉम्बस्फोट आणि इतर हिंसाचारात १०००हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. यापैकी बहुतांश मृत्यू मशिदी आणि बाजारपेठांजवळ झालेल्या आयआयडी स्फोटांमुळे झाले आहेत. अफगाणिस्तानला विशेषतः ISISकडून सुरक्षा आव्हानांचा सामना करावा लागत असल्याची माहिती आहे.