ऑनलाइन लोकमत
पॅरीस, दि. ९ - जिहादी कारवायांमुळे हादरलेल्या फ्रान्समधल्या नागरिकांशी सौहार्द वाढावं यासाठी या आठवड्याच्या अखेरीस शेकडो मशिदींची दारं खुली होणार असून ओपन हाऊस सेशन्स घेण्यात येणार आहेत.
एएफपीनं दिलेल्या वृत्तानुसार फ्रेंच काउन्सिल ऑफ दी मुस्लीम फेथ या संघटनेने इस्लामविषयी चर्चा सुरू व्हावी आणि राष्ट्रीय एकात्मता निर्माण व्हावी यासाठी हे पाऊल उचलल्याचं सांगण्यात आलं आहे. चाल्री हेब्दो या व्यंगचित्र नियतकालिकाच्या कार्यालयावर व एका ज्यू सुपरमार्केटवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यांत १७ जणांनी जीव गमावला होता. त्यानंतर फ्रान्समध्ये इस्लामविरोधी वातावरण तयार झाले.
त्यामुळे लोक एकत्र येतील, सर्वसामान्य मुस्लीमांना भेटतील त्यांच्याशी संवाद साधतिल आणि इस्लामचं खरं मूल्य काय आहे हे सांगता येईल असा यामागचा हेतू असल्याचे संघटनेचे अध्यक्ष अनाउल बिबेक यांनी म्हटलं आहे.
फ्रान्समध्ये सुमारे अडीच हजार मशिदी आहेत, परंतु सगळ्या ठिकाणी हा उपक्रम करण्यात येणार नसून महत्त्वाच्या शेकडो मशिदींमध्ये ही ओपन हाऊस सेशन्स भरवण्यात येणार आहेत.