प्रश्न- मी अमेरिकेचा नागरिक असून भारतात असलेल्या माझ्या कुटुंबाच्या भेटीसाठी जाणार आहे. मला अमेरिकेच्या दुतावासाकडून बातम्या आणि अलर्ट कसे मिळू शकतील?उत्तर- स्मार्ट ट्रॅव्हलर एन्रोलमेंट प्रोग्राममध्ये (स्टेप) नावनोंदणी करून अमेरिकन नागरिक ते प्रवास करत असलेल्या देशांमधील अमेरिकेच्या दुतावासाकडून तिथल्या सुरक्षेशी संबंधित महत्त्वाची माहिती मिळवू शकतात. स्टेप ही मोफत ऑनलाईन नोटिफिकेशन यंत्रणा असून त्या माध्यमातून अमेरिकन नागरिकांना परदेशात असताना सुरक्षेच्या संदर्भातील आवश्यक माहिती मिळते. यासाठी अमेरिकन नागरिकांना स्टेपवर त्यांचा संपर्क क्रमांक द्यावा लागतो.अमेरिकन दुतावास स्टेपच्या माध्यमातून कोविड-१९ महामारीशी संबंधित माहिती अमेरिकेच्या नागरिकांना देत आहे. नैसर्गिक आपत्ती किंवा कौटुंबिक आणीबाणीच्या परिस्थितीतही अमेरिकन दुतावास स्टेपच्या माध्यमातून महत्त्वाची माहिती पुरवतो. अमेरिकन नागरिक प्रवास करत असलेल्या देशांमध्ये आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाल्यास त्याबद्दलची सर्व आवश्यक आणि महत्त्वाची माहिती अमेरिकन दुतावास पुरवतो. स्टेप प्रोग्रामसाठी नोंदणी केलेल्या अमेरिकन नागरिकांना ही माहिती पुरवली जाते. step.state.gov या संकेतस्थळावर संपर्काबद्दलची माहिती देऊन अमेरिकेचे नागरिक स्टेपसाठी त्यांच्या नावाची नोंद करू शकतात. त्यानंतर तुम्ही दिलेल्या फोन नंबर आणि ईमेलवर मेसेज पाठवले जातात. तुम्ही करत असलेल्या कोणत्याही आंतरराष्ट्रीय प्रवासाची माहिती प्रोफाईलवर देऊ शकता. उदाहरणार्थ, तुम्ही भविष्यात फ्रान्सला जाणार असाल, तर तुम्ही प्रवासाच्या तारखांचा तपशील स्टेपवर ऑनलाईन नोंदवू शकता. या कालावधीत फ्रान्समध्ये कोणतीही आणीबाणी निर्माण झाल्यास अमेरिकन दुतावास तुम्हाला अलर्ट पाठवतो. या प्रोफाईलमध्ये तुम्ही कुटुंबातील सदस्यांच्या नावांचीदेखील नोंद करू शकता.तुम्ही स्टेप प्रोग्राममध्ये नावाची नोंदणी केली असल्यास अमेरिकन दुतावासाला आणीबाणीच्या परिस्थितीत तुमच्यासोबत थेट संपर्क साधता येतो. अमेरिकन नागरिकांनी स्टेप प्रोग्राममध्ये त्यांच्या नावाची नोंद करावी आणि कोणत्याही देशात जाण्याआधी स्टेप प्रोफाईलमध्ये त्याची माहिती द्यावी. त्यामुळे त्यांना सुरक्षित राहण्यास मदत होते.
अमेरिकन नागरिकांना भारतात असताना दुतावासाकडून अलर्ट कसे मिळू शकतात?
By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2020 6:48 PM