पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या फ्रान्स दौऱ्यासाठी गुरुवारी सकाळी नवी दिल्लीहून पॅरिसला रवाना झाले. आज दुपारी त्यांचं विमान पॅरिसला लँडींग झाल्यानंतर त्यांचं मोठ्या उत्साहात विमानतळावर स्वागत करण्यात आलं. मोदींच्या स्वागताला भारतीय नागरिकांनीही गर्दी केली होती. मोदींच्या या दोन दिवसीय दौऱ्यात भारत आणि फ्रान्समधील द्विपक्षीय संरक्षण संबंधांच्या विस्ताराला प्राधान्य दिले जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. १४ जुलैला होणाऱ्या फ्रान्समधील बॅस्टिल डे सोहळ्याला नरेंद्र मोदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
नरेंद्र मोदी फ्रान्स दौऱ्यादरम्यान ते राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि इतर फ्रेंच मान्यवरांशी चर्चा करणार आहेत. तसेच, नरेंद्र मोदी भारतीय समुदाय आणि काही कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत सुद्धा संवाद साधणार आहेत. विशेष म्हणजे भारत फ्रान्सकडून २६ राफेल आणि ३ स्कॉर्पिन पाणबुड्या खरेदी करू शकतो. त्यामुळे नरेंद्र मोदी आणि इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या भेटीदरम्यान राफेल खरेदीसाठी फ्रान्स आणि भारत सरकारमधील कराराला अंतिम रूप दिले जाऊ शकते, अशीही चर्चा आहे. दरम्यान, आज दुपारी मोदी पॅरिसमध्ये पोहोचल्यानंतर त्यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्समधील पॅरिस येथे पोहोचल्यानंतर त्यांचं पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आलं. फ्रान्सचे पंतप्रधान स्वत: मोदींच्या स्वागताला हजर होते. यावेळी, फ्रान्समधील भारतीयांनाही मोदींच्या स्वागताला हजेरी लावली होती. पॅरिस, फ्रान्समध्ये मोदींना भेटताना भारतीय नागरिकांनी 'भारत माता की जय' चा जयघोष केला. यावेळी, तिरंगा झेंडा दाखवत आणि दोन हात जोडून मोदींचे स्वागत केले. त्यावेळी, एका युवकाने मोदींना सवाल केला, तुम्ही दररोज २० तास काम करता, आम्हीही २० तास काम कसं करू शकतो? असा सवाल करत मोदींना प्रश्न केला. या युवकाने हाती मोबाईल धरुन मोदींना मनातील प्रश्न विचारला होता. यावेळी, मोदींनी युवकाच्या खांद्यावर हसत हसत हात टाकत उत्तर देण्याचं टाळलं, त्यानंतर दोन्ही हात हलवत अभिवादन करत पुढे गेले.
दरम्यान, पंतप्रधान मोदी आज रात्री ११ वाजता सीन म्युझिकेल येथे भारतीय समुदायाला उद्देशून भाषण करणार आहेत. त्यामुळे, पॅरिसमधील भारतीयांमध्ये उत्साह असून मोदींच्या भाषणासाठी अनिवासी भारतीय आतुर झाले आहेत.
बॅस्टिल डे परेडमध्ये मोदींचा सहभाग
१४ जुलै रोजी होणार्या फ्रान्सच्या वार्षिक बॅस्टिल-डे परेडमध्ये भारताच्या तिन्ही सैन्यांच्या २६९ सदस्यीय दल सुद्धा सहभागी होणार आहे. यावेळी, फ्रेंच विमानांसह, भारतीय हवाई दलाची (IAF) तीन राफेल लढाऊ विमाने देखील फ्लायपास्टमध्ये सहभागी होतील. तसेच, इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याशी संरक्षण, अंतराळ, व्यापार आणि गुंतवणूक यासह अनेक महत्त्वाच्या क्षेत्रात फ्रान्स आणि भारत यांच्यातील सहकार्य पुढे नेण्यासाठी नरेंद्र मोदी चर्चा करतील.
फ्रान्सनंतर अबुधाबी दौऱ्यावर रवाना
फ्रान्स दौऱ्यानंतर नरेंद्र मोदी अबुधाबीलाही जाणार आहेत. नरेंद्र मोदींनी गुरुवारी सकाळी ट्विट केले की, "पॅरिसला रवाना होत आहे, जिथे मी बॅस्टिल डे सोहळ्यामध्ये सहभागी होणार आहे. मी राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि इतर फ्रेंच मान्यवरांशी चर्चेसाठी उत्सुक आहे. इतर कार्यक्रमांमध्ये भारतीय समुदाय आणि शीर्ष सीईओ यांच्याच्यासोबत होणाऱ्या चर्चेत सहभाग घेणार आहे."
लष्कराचे सामर्थ्य आणखी बळकट होणार!
गेल्या काही वर्षांत भारताचे लष्करी सामर्थ्य खूप वाढले आहे. ते आणखी बळकट करण्यासाठी भारत प्रयत्नशील आहे. त्यामुळे भारत फ्रान्सकडून २६ राफेल लढाऊ विमाने आणि ३ स्कॉर्पिन पाणबुड्या खरेदी करण्याचा विचार करत आहे. यासंदर्भातील प्रस्ताव संरक्षण दलाने संरक्षण मंत्रालयासमोर ठेवला आहे. नरेंद्र मोदी आणि इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या भेटीदरम्यान राफेल खरेदीचा करार होऊ शकतो. हा करार ९० हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त असू शकतो, असा अंदाज आहे. मात्र, अंतिम खर्च करारावर स्वाक्षरी झाल्यानंतरच समजणार आहे.