प्रश्न: माझा अमेरिकेचा नॉन इमिग्रंट व्हिसा मी कसा वाचावा?उत्तर: तुमच्या अमेरिकन नॉन इमिग्रंट व्हिसामध्ये बरीचशी माहिती असते. त्यातल्या विविध रकान्यांमध्ये असलेल्या माहितीबद्दल तुम्हाला पुरेसं ज्ञान असणं गरजेचं आहे. या रकान्यांमधला तपशील कसा वाचायचा, हेदेखील तुम्हाला माहीत असायला हवं. त्यात कोणतीही चूक नसल्याची खात्री तुम्ही करून घ्यायला हवी. अन्यथा अमेरिकेत प्रवेश करताना तुम्हाला विलंब होऊ शकतो. व्हिसाच्या वरील भागात असलेल्या काऊन्सिलर सेक्शनमध्ये देण्यात आलेल्या माहितीविषयी तुम्ही चिंता करू नका. यामध्ये पोस्ट नेम आणि कंट्रोल नंबर दिलेला असतो. पोस्ट नेम म्हणजे तुमचा व्हिसा ज्या शहरात छापण्यात आलाय, त्या शहराचं नाव. तर कंट्रोल नंबर म्हणजे तुम्हाला देण्यात आलेला विशिष्ट क्रमांक. व्हिसावरील इतर माहिती वैयक्तिक स्वरुपाची असते. ही माहिती आणि तुमच्या पासपोर्टवरील माहिती सारखीच असायला हवी. यामध्ये आडनाव, तुम्ही दिलेलं नाव, पासपोर्ट क्रमांक, लिंग, जन्मदिनांक आणि राष्ट्रीयत्वाचा समावेश असतो. तुमच्या व्हिसावरील आडनाव किंवा तुम्ही दिलेल्या नावाचा रकाना रिकामा असेल, तर तुम्हाला तिथे FNU अशी तीन अक्षरं छापलेली दिसतील. प्रक्रियेनुसार ही अतिशय सामान्य बाब आहे. तुमच्या नावात कायदेशीरदृष्ट्या बदल झाला असल्यास, तुम्हाला नव्या व्हिसासाठी अर्ज करून त्यासाठी आवश्यक शुल्क भरावं लागेल. तुमच्या नावात बदल झाला असल्यास आणि तुमचा व्हिसा वैध असल्यास तुम्ही जुना व्हिसा वापरू शकता. मात्र त्यासाठी तुम्हाला प्रवासादरम्यान आवश्यक कागदपत्रं (उदाहरणार्थ, तुमचं लग्न झालं असल्यास विवाह प्रमाणपत्र) सोबत ठेवावी लागतील. तुमच्याकडे योग्य कागदपत्रं असल्यावर अमेरिकेतला प्रवेश सुकर होतो. व्हिसावर वर्गीकरण आणि वैधतेसंबंधी माहिती असते. वर्गीकरण रकान्यातली माहिती (क्लास फिल्ड) आणि तुम्ही ज्या प्रकारच्या व्हिसासाठी अर्ज केलाय, तो व्हिसा प्रकार सारखाच असायला हवा. बहुतांश प्रवाशांना 'आर' प्रकारचा व्हिसा मिळतो. त्याचा अर्थ रेग्युलर असा होतो. तर एन्ट्री फिल्डमध्ये बहुतेकदा एम अक्षर छापलेलं असतं. याचा अर्थ मल्टिपल ट्रिप असा होतो. व्हिसा जारी करण्यात आल्याची तारीख आणि त्याची मुदत संपण्याची तारीखदेखील नमूद करण्यात आलेली असते. बहुतांश प्रवाशांच्या व्हिसावरील अॅनोटेशनचा (टिप्पणी) रकाना रिकामाच असतो. काही व्हिसांवर या रकान्यात शैक्षणिक संस्था किंवा अमेरिकेतल्या कंपनीची माहिती असते. तुम्ही कुठे जाणार आहात, याबद्दलचा सविस्तर तपशील या रकान्यात असतो. तुमच्या अमेरिकेतल्या प्रवासाबद्दलची अधिकची माहिती या रकान्यात असते. व्हिसावरील फोटो किंवा माहितीत चूक असल्यास थेट support-india@usatraveldocs.com संपर्क साधा. व्हिसावरील नेमकी कोणती माहिती चुकलीय ते मेलमध्ये नमूद करा. याशिवाय व्हिसा स्टॅम्पची फोटोकॉपीदेखील जोडा. व्हिसामध्ये चूक झाल्याचं आमच्या लक्षात आल्यास आम्ही योग्य माहितीसह तुमचा व्हिसा नव्यानं छापून देऊ.
अमेरिकेचा नॉन इमिग्रंट व्हिसा कसा वाचावा?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2020 9:01 AM