जेरुसलेम - इस्रायल स्वतंत्र झाल्यापासून या देशाची गुप्तवार्ता संघटना मोसादने जगभरात अनेक कारवाया केल्या आहेत. इराकच्या अणुभट्ट्या उडवणे, युगांडाच्या इदी अमिनच्या ताब्यातून आपल्या नागरिकांना सोडवून आणणे, म्युनिक ऑलिम्पिक्समध्ये मारल्या गेलेल्या इस्रायली नागरिकांच्या हत्येचा सूड घेणे अशा अनेकवेळेस मोसादने आपली कामगिरी पार पाडली आहे. इतकेच नव्हे तर दुसऱ्या महायुद्धानंतर दक्षिण अमेरिकेतील विविध देशांमध्ये पळून गेलेल्या आइखमान, क्लाऊस बार्बी, जोसेफ मेंगेला, हर्बर्ट कुकुर्स यांसारख्या नाझी अधिकाऱ्यांना शोधून काढले. कित्येक नाझी अधिकाऱ्यांना मारुनही टाकले. तशी आणखी एक साहसी मोहीम मोसादने इराणमध्ये पार पाडली.
(वेअरहाऊसमधील या कपाटांमध्ये फाईल्स व गुप्त माहिती असलेल्या सीडी होत्या)
यॉर्क टाइम्सने मोसादच्या या इराणमधील मोहिमेबद्दल माहिती प्रसिद्ध केली आहे. 31 जानेवारी रोजी मोसादचे लोक इराणची राजधानी तेहरानमधील औद्योगिक वसाहतीमध्ये एका वेअरहाऊसमध्ये घुसले. या वेअरहाऊसमध्ये मोसादच्या लोकांनी सुमारे 6 तास 29 मिनिटे शोध मोहीम राबवली आणि सकाळी 7 वाजता कामगारांची शिफ्ट सुरु होण्यापुर्वी आपलं काम थांबवून ते बाहेरही पडले. या कालावधीत मोसादच्या एजंटसनी तेथील अलार्म्स निकामी केले होते तसेच दोन दारंही फोडून आत प्रवेश केला आणि सुमारे डझनभर कपाटं फोडून कागदपत्रे घेऊन ते पळालेही. कपाटं तोडण्यासाठी 2000 अंश तापमानाची ऊर्जा निर्माण करणारे ब्लोटॉर्चेसही त्यांच्याकडे होते. इतर अनेक कपाटं सोडून नेमकी याच कपाटातील कागदपत्रे मोसादने पळवली आहेत यामुळे त्यांना नक्की कोणी मदत केली असावी यावर तर्क केले जात आहेत.