प्रश्न: मी येत्या जानेवारीपासून अमेरिकेत मास्टर्स डिग्रीसाठी शिक्षण घेण्यास सुरुवात करू इच्छितो. त्यासाठी पुढील आठवड्यात अमेरिकेच्या स्टुडंट व्हिसासाठी (F-1) माझी मुलाखत आहे. या मुलाखतीसाठी मी काय तयारी करावी? त्यावेळी कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता भासेल?उत्तर: स्टुडंट व्हिसासाठी (F-1) मुलाखत देताना समोरच्या अधिकाऱ्याला प्रामाणिकपणे उत्तरं द्या. मुलाखतीत तुमच्या शैक्षणिक योजनांबद्दल प्रश्न विचारले जातील. याशिवाय शिक्षण पूर्ण केल्यानंतर तुम्ही काय करणार, या संदर्भातही तुमच्याकडे विचारणा केली जाईल. तुम्ही मुलाखतीला येताना तुमचा पासपार्ट आणि तुम्ही प्रवेश घेत असलेल्या शैक्षणिक संस्थेचा फॉर्म आय-20 (नॉनइमिग्रंट स्टुडंट व्हिसासाठी पात्र असल्याचं प्रमाणपण) आणणं गरजेचं आहे. तुम्ही मुलाखतीला येताना आय-901 स्टुडंट अँड एक्चेंज व्हिजिटर इन्फर्मेशन सिस्टम (एसईव्हीआयएस) फी रीसीप्टदेखील सोबत ठेवायला हवी. त्यातून तुम्ही फी भरल्याची माहिती समजते. तुम्ही अमेरिकेत ज्या शैक्षणिक अभ्यासक्रमासाठी जाऊ इच्छिता, त्यासाठी तुम्ही तयार आहात का, हे मुलाखत घेणारा अधिकारी तपासून पाहतो. तुम्ही अमेरिकेत येऊन शिकणारा अभ्यासक्रम तुमच्या भूतकाळातील शिक्षणाशी संबंधित आहे ना, अमेरिकेतल्या शिक्षणामुळे तुम्हाला तुमची व्यावसायिक ध्येयं साध्य करण्यात मदत होणार आहे का, हेदेखील जाणून घेण्याचा प्रयत्न दुतावासातील अधिकारी करू शकतात.तुमच्या अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षाचं शैक्षणिक शुल्क आणि राहण्यास येणारा खर्च तुम्ही करू शकता, हे तुम्हाला अधिकाऱ्याला पटवून द्यावं असतं. अमेरिकेच्या व्हिसा अर्जाची प्रक्रिया मुलाखतीवर आधारित असून ती कागदपत्रांवर आधारित नाही, हे लक्षात असू द्या. त्यामुळे तुम्हाला तुमच्या आर्थिक योजनांबद्दलची (बचत, शिष्यवृत्ती, कर्ज) माहिती मुलाखतीदरम्यान तोंडी सांगता यायला हवी. व्हिसा मुलाखतीवेळी चुकीची माहिती देण्यास सांगणाऱ्या किंवा खोटी कागदपत्रं सादर करण्यास सांगणाऱ्या व्यक्तींपासून सावध राहा. दुतावासातील अधिकाऱ्यांना प्रामाणिकपणे उत्तरं द्या. त्यांनी कागदपत्रांबद्दल विचारणा केल्यास योग्य कागदपत्रं दाखवा. तुमचा व्हिसा मंजूर झाल्यास तो काही दिवसांतच तुम्हाला मिळेल. तुम्हाला पासपार्ट आणि व्हिसा मिळाल्यावरच अमेरिकेला जाणाऱ्या विमानाचं तिकीट बुक करा, असं आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो.
अमेरिकेच्या स्टुटंड व्हिसासाठी मुलाखत देताना काय तयारी करावी?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2019 5:34 AM