नवी दिल्ली: देशातील ओमायक्रॉन बाधितांचा आकडा २३ वर पोहोचला आहे. गेल्या आठवड्यात गुरुवारी देशात ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण आढळून आला. त्यानंतर चार दिवसांत हा आकडा २० च्या पुढे गेला आहे. राज्यात आतापर्यंत १० जणांना नव्या व्हेरिएंटची लागण झाली आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे. ओमायक्रॉन अधिक संक्रामक आहे. त्याचा फैलाव अतिशय वेगानं होतो.
ओमायक्रॉन व्हेरिएंट डेल्टापेक्षा अधिक वेगानं पसरतो. त्याच्या संक्रमणाचा वेग किती आहे ते हाँगकाँगमधल्या एका क्वारंटिन हॉटेलमध्ये दिसून आलं आहे. एका प्रवाशानं त्याची खोली सोडलेली नाही, तो कोणाच्याही संपर्कात आलेला नाही, मात्र त्यानं खाद्यपदार्थ घेण्यासाठी किंवा कोविड चाचणीसाठी दरवाजा उघडताच विषाणू हवेत पसरतो. हॉटेलच्या सीसीटीव्ही फुटेजमधून ही बाब समोर आली आहे. हाँगकाँग विद्यापीठाच्या संशोधकांनी एका जर्नलमध्ये याचा उल्लेख केला आहे.
कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या व्यक्तींनादेखील ओमायक्रॉनची लागण होत असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे देशातील ५० टक्के पात्र लोकसंख्येचं लसीकरण पूर्ण होऊनही चिंता वाढली आहे. जगातील शास्त्रज्ञ ओमायक्रॉनचा अभ्यास करत आहेत. ओमायक्रॉनचे म्युटेशन्स कोणत्या पातळीपर्यंत जाऊन लसीचा प्रभाव भेदू शकतात, यासाठी जगभरातील ४५० शास्त्रज्ञ संशोधन करत आहेत. या प्रश्नाचं उत्तर पुढील काही दिवसांत मिळू शकेल.
सध्या देशात ओमायक्रॉनचे किती रुग्ण?आतापर्यंत देशात ओमायक्रॉनचे २३ रुग्ण आढळून आले आहेत. पैकी १० रुग्ण महाराष्ट्रातील आहेत. राजस्थानमध्ये ९ रुग्णांची नोंद झाली आहे. कर्नाटकमध्ये २, तर दिल्ली आणि गुजरातमध्ये प्रत्येकी १ रुग्ण आढळून आला आहे. २ डिसेंबरला देशात पहिल्या कोरोना रुग्णाची नोंद झाली. बंगळुरूमध्ये हा रुग्ण आढळून आला. रविवारी पुणे जिल्ह्यात ओमायक्रॉनचे ७ रुग्ण सापडले. यापैकी ६ जण एकाच कुटुंबातील आहेत.