वॉशिंग्टन - पृथ्वीवरून सूर्यास्ताचा नयनरम्य नजारा तुम्ही नेकदा पाहिला असेल. तसेच जगाच्या विविध भागातील सूर्यास्ताची छायाचित्रेही तुम्ही पाहिली असतील. अस्तास जाणारा सूर्य आणि त्याच्या प्रकाशात न्हाऊन निघालेले आसमंत असे चित्र कुणाचेही मन मोहून घेते. मात्र कधी तुम्ही सूर्यमालेतील इतर ग्रहांवरील सूर्यास्त कसा दिसत असेल, याचा विचार केला आहे का? अनेकांनी हा विचारच केलेला नसेल. मात्र आता नासाने मंगळग्रहावरील सूर्यास्ताची काही नयनरम्य छायाचित्रे समोर आणली आहेत.
बऱ्याच काळापासून मंगळ ग्रहावरील जीवनाचा शोध घेत असलेल्या नासाच्या शास्त्रज्ञांनी इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. पांढरे ढग, पर्वतासारख्या दगडांदरम्यान अस्तास जाणाऱ्या सूर्याचा फोटो पाहून ही पृथ्वी आहे की मंगळ आहे, असा प्रश्न तुम्हाला पडू शकतो. हा फोटो शेअर करताना नासाने त्याखाली लिहिले की, लाल ग्रहावरील एक निळा सूर्यास्त. आमच्या मंगळावरील रोव्हरने सूर्यास्ताचा आपला पहिला फोटा घेतला आहे. नासाच्या पोस्टनुसार हा फोटो मास्टकॅम-झेड कॅमेरा सिस्टिमद्वारे ९ नोव्हेंबर २०२१ रोजी घेतला आहे. मंगळ ग्रहावरील सूर्यास्ताचा फोटो मोहिमेच्या २५७ व्या दिवशी घेतला गेला.
नासाच्या शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, मंगळग्रहावरून सूर्यास्ताचा काढलेला हा पहिला फोटो आहे. नासाने सांगितले की, मंगळावरील सूर्यास्ताचा आढावा १९७० पासून आढावा घेतला जात आहे. नासाने सांगितले की, मंगळ ग्रहावरील सूर्यास्त सर्वसाधारणपणे निळ्या रंगाचा दिसतो. तो वातारवणातील धुळीपासून निर्माण होतो.