वॉशिंग्टन- कसा मिळवायचा पैसा, पगार कसा वाढेल, मिळालेले पैसे कसे वाचवू हे झाले सर्वसामान्यांचे प्रश्न पण जगातील धनाढ्य व्यक्तींपैकी असणाऱ्या वॉरेन बफे यांना मात्र पैशाचं करायचं काय असा प्रश्न पडला आहे. वॉरेन बफे यांच्याकडे 116 अब्ज डॉलर्स इतकी संपत्ती आहे. त्याचं ते काय करणार याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे.
शनिवारी ते बर्कशायर हॅथवेच्या वार्षिक बैठकीला उपस्थित राहिले होते. येथे त्यांनी जगातील सर्वात मोठ्या काही गुंतवणूकदारांना व्यवसायासाठी टीप्स दिल्या तसेच इनेक मुद्द्यांवर त्यांनी चर्चाही केली. पण त्यांच्याकडे असलेल्या संपत्तीचा मुद्दाही चर्चेत आला. वॉरेन बफे यांच्याकडे 116 अब्ज डॉलर्स इतका पैसा असून ते 100 अब्ज डॉलर्सच्या गटात जाऊन बसणाऱ्या टीसीएस या भारतीय कंपनीला सहज खरेदी करु शकतात. इतकेच नाही तर भारतीय बँकाचे झालेले नुकसानही ते एका भरुन देऊ शकतात. भारतीय बँकांचे बुडालेले कर्ज 8 लाख 96 हजार 891 कोटी इतके आहे तर बफे यांच्याकडे 7 लाख 65 हजार 600 कोटी इतके रुपये आहेत.
आता तुम्हाला वाटेल एवढा पैसा असणारा माणूस एकदम सुखात असेल त्यांना कसलीच चिंता नसेल. पण हा पैसाच त्यांच्या चिंतेचा विषय आहे. या पैशाचं काय करायचा यावर विचार करायला अजूनही बैठका घेतात, त्याचा विनियोग कसा करायचा यावर चर्चा करतात. वॉरेन बफे गुंतवणूकदारांमध्ये हा पैसा लाभांश म्हणून वाटून टाकतील असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र परवाच्या बैठकीत त्यांनी असे कोणतेही संकेत दिले नाही. ते म्हणतात, माझा विश्वास पैसा गुंतवण्यावर अधिक आहे. वॉरेन बफे एक उत्तम व मोठे गुंतवणूकदार म्हणून ओळखले जातात. त्यांनी अॅपल, आयबीएमसारख्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केलेली आहे.