वॉशिंग्टन - 2019 च्या लोकसभा निवडणुकीत मिळवलेला मोठा विजय आणि जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटवण्याचा धोरणात्मक निर्णय घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रथमच 7 दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान, नरेंद्र मोदी हे संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेला संबोधित करणार आहेत. पंतप्रधान मोदी अमेरिकेत दाखल झाले असून आज अमेरिकेच्या टेक्सासमधील ह्युस्टन सिटीमध्ये असणार आहेत. ह्युस्टनमध्ये ऐतिहासिक ‘हाऊडी मोदी’ कार्यक्रमाची जोरदार तयारी सुरू आहे. ह्युस्टनमध्ये नरेंद्र मोदींनी तेल क्षेत्रातील कंपन्यांच्या सीईओंशी चर्चा केली आहे.
‘टेक्सास इंडिया फोरम’ हे ‘हाऊडी मोदी’ कार्यक्रमाचे आयोजक आहेत. मात्र, भाजपचा परराष्ट्र व्यवहार विभाग आणि पीएमओ या व्यवस्थेची देखरेख करीत आहेत. तीन तासांचा हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पीएमओ नियमितपणे व्हाईट हाऊसच्या संपर्कात आहे. असे संकेत मिळत आहेत की, ट्रम्प हे ‘हाऊडी मोदी’ कार्यक्रमात पूर्ण वेळ थांबणार नाहीत. दोन्ही देशांतील तणाव दूर करण्यासाठी ट्रम्प काही घोषणा करू शकतात. ह्युस्टनमध्ये गुजराती समुदायाचे समर्थन प्राप्त करण्यासाठी भाजपाचे गुजरातमधील आमदार आणि काही खासदार यापूर्वीच ह्युस्टनमध्ये दाखल झाले आहेत. डेमोक्रॅटिकचे वरिष्ठ सदस्य स्टेनी होयरसह 60 पेक्षा अधिक अमेरिकी संसद सदस्य सहभागी होतील.
ह्युस्टन येथे NRG स्टेडियममध्ये Howdy Modi Mega Show मध्ये मोदी सहभागी होतील. या कार्यक्रमाच्या माध्यमातून अमेरिका-भारत यांच्यातील संबंध, संस्कृती आणि व्यापाराबाबत चर्चा होणार आहे. या कार्यक्रमामुळे भारत आणि अमेरिकेमधील द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत होणार आहेत. दरम्यान, ह्युस्टनमध्ये होणाऱ्या या कार्यक्रमात भारत आणि अमेरिकेतील द्विपक्षीय संबंध, व्यापार, संस्कृती यावर चर्चा होणार आहे. या कार्यक्रमात मोदी आणि ट्रम्प यांच्यासोबत अनेक मोठ्या व्यक्तीही सहभागी होण्याची शक्यता आहे. तसेच जगातील दोन देशांचे प्रमुख एकाच मंचावरून हजारोंच्या जनसमुदायाला संबोधित करण्याची ही पहिलीच वेळ असेल.
‘हाउडी’चा अर्थ काय?
Howdy Modi शब्दाचा अर्थ, दक्षिण-पश्चिम अमेरिकेत Howdy हा शब्द अभिवादन करण्यासाठी वापरला जातो. हाऊडी मोदी म्हणजे How do you Modi असा आहे. या कार्यक्रमात अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांपासून सामान्य लोकांपर्यंत सर्वजण एक विचारणार आहे ते म्हणजे मोदी, तुम्ही कसे आहात? या कार्यक्रमाची उत्सुकता सगळ्यांनाचा लागून राहिली आहे. हाऊडी मोदी या महासोहळ्याप्रमाणे अमेरिकेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ग्लोबल पीसमेकर पुरस्कारही दिला जाणार आहे. स्वच्छ भारत अभियानाच्या माध्यमातून त्यांनी भारतात केलेल्या जागरुकतीसाठी नरेंद्र मोदींचा सन्मान केला जाणार आहे. अमेरिकेत 24 सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 150 वी जयंती साजरी करणार आहेत. तसेच 22 सप्टेंबर रोजी होणाऱ्या हाऊडी मोदी या कार्यक्रमाला राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सहभागी होतील आणि 50 हजार मूळ भारतीय अमेरिकी या कार्यक्रमाला हजेरी लावतील.