ह्युस्टन - पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर असून आज ह्युस्टनमध्ये 'हाऊडी मोदी' या भव्यदिव्य कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. विशेष बाब म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे सुद्धा मोदींसोबत या कार्यक्रमात सहभागी होतील. सुमारे 50 हजार लोक या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. भारत आणि अमेरिकेमधील संबंधांच्या दृष्टीने या कार्यक्रमाला महत्त्वपूर्ण मानले जात आहे. 'हाऊडी मोदी' या कार्यक्रमात भारतीय वंशाचा 16 वर्षीय मुलगा राष्ट्रगीत गाणार आहे. स्पर्श शहा असं त्याचं नाव असून तो पंतप्रधान मोदींना भेटण्यासाठी खूपच उत्सूक आहे.
स्पर्श हा रॅपर, सिंगर, लेखक आणि मोटिवेशनल स्पीकर आहे. अमेरिकेच्या न्यू जर्सीमध्ये राहणारा स्पर्श ऑस्टियोजिनेसिस इमपर्फेक्टा (Osteogenesis Imperfecta Or Brittle Bone Disease) या दुर्मीळ आजाराने त्रस्त आहे. या आजारामध्ये हाडं खूप कमजोर होऊन तूटतात. त्यामुळे स्पर्श कायम व्हिलचेअरवर असतो. मात्र या आजारावर मात करत तो एक लोकप्रिय रॅपर आणि प्रेरणादायी वक्ता झाला आहे. स्पर्शला प्रसिद्ध रॅपर व्हायचं आहे. तसेच कोट्यवधी लोकांसमोर परफॉर्म करण्याची खूप इच्छा आहे.
2018 मध्ये स्पर्शच्या जीवनावर आधारीत असलेली 'ब्रिटल बोन रॅपर' नावाची एक डॉक्युमेंट्री प्रदर्शित झाली आहे. 'हजारो लोकांसमोर गाणं ही माझ्यासाठी ही खूप मोठी गोष्ट आहे. मी राष्ट्रगीत गाण्यासाठी उत्सूक आहे. मी पहिल्यांदा मोदीजींना मॅडिसन स्क्वायर गार्डन येथे पाहिलं होतं. मी त्यांना भेटू इच्छित होतो. पण त्यांना केवळ टीव्हीवर पाहिलं. मात्र आता मोदींना भेटण्यासाठी खूप उत्सूक आहे' असं स्पर्श शहाने म्हटलं आहे. ह्युस्टनमध्ये ऐतिहासिक ‘हाऊडी मोदी’ कार्यक्रमाची जोरदार तयारी सुरू असून स्पर्श आज त्यामध्ये राष्ट्रगीत गाणार आहे.
ह्युस्टन येथे NRG स्टेडियममध्ये Howdy Modi Mega Show मध्ये मोदी सहभागी होतील. या कार्यक्रमाच्या माध्यमातून अमेरिका-भारत यांच्यातील संबंध, संस्कृती आणि व्यापाराबाबत चर्चा होणार आहे. या कार्यक्रमामुळे भारत आणि अमेरिकेमधील द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत होणार आहेत. दरम्यान, ह्युस्टनमध्ये होणाऱ्या या कार्यक्रमात भारत आणि अमेरिकेतील द्विपक्षीय संबंध, व्यापार, संस्कृती यावर चर्चा होणार आहे. या कार्यक्रमात मोदी आणि ट्रम्प यांच्यासोबत अनेक मोठ्या व्यक्तीही सहभागी होण्याची शक्यता आहे. तसेच जगातील दोन देशांचे प्रमुख एकाच मंचावरून हजारोंच्या जनसमुदायाला संबोधित करण्याची ही पहिलीच वेळ असेल.