ह्यूस्टन : अमेरिकेच्या ह्यूस्टन शहरातील एनआरजी स्टेडिअममध्ये हाऊडी मोदी हा कार्यक्रम सुरु झाला असून सोशल मिडीयावरही नेटकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. कार्यक्रमस्थळी जवळपास 50 हजाराच्या आसपास नागरिक उपस्थित असून अमेरिकेत आयोजन असल्याने ट्रम्प पहिले संबोधित करणार की, भारतीयांनी आयोजित केल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिले बोलतील, याकडे लक्ष लागले आहे.
कार्यक्रमाची सुरुवात भरतनाट्य, गरब्याने झाली. यानंतर तबलावादन, व्हायोलिन आदी वाद्यांची मैफल रंगली होती. यानंतर मंचावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत अमेरिकेच्या खासदारांनी केले. यावेळी मोदी यांनी वाकून उपस्थितांना नमस्कार केला. यावेळी मोदी, मोदीच्या घोषणेने स्टेडिअम दणाणून गेले होते.
अगदी याचवेळी प्रेक्षकांमध्ये महात्मा गांधीजींच्या वेषामध्ये एक भारतीय नागरीक सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. त्याला महात्मा गांधींच्या वेषामध्ये असल्याने काय संदेश देऊ इच्छिता असे विचारले असता मोदी आणि गांधी एकच असल्याचे त्यांनी सांगितले. ''मोदी आणि गांधी एकच आहेत. ते संत, फकीर आहेत. गांधी फकीर होते, मोदींचेही सारखेच वागणे आहे, असे महात्मा गांधी बनलेल्या रमेश मोदी यांनी सांगितले.