ह्युस्टन - सध्या अमेरिका दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अनेकांच्या भेटीगाठी घेतल्या. यादरम्यान मोदींनी अमेरिकास्थित काश्मिरी पंडितांच्या प्रतिनिधी मंडळाचीही भेट घेतली. मोदींना भेटल्यानंतर काश्मिरी पंडित भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. त्यापैकी काही जणांनी मोदींच्या हातांचे चुंबन घेत मोदींचे आभार मानले. काश्मिरी पंडितांनी नमस्ते शारदा देवी या श्लोकाचे वाचन केल्यावर श्लोकाच्या शेवटी मोदी 'अगेन नमो नम:' असे म्हणाले. त्यानंतर तेथे उपस्थित असलेल्यांमध्ये एकच हशा पिकला. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत मिळवलेला मोठा विजय आणि जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटवण्याचा धोरणात्मक निर्णय घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रथमच 7 दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. दरम्यान, ह्युस्टन येथे मोदींनी काश्मिरी प्रतिनिधी मंडळाची भेट घेतली. काश्मीरमधून कलम ३७० कलम हटवल्याच्या पार्श्वभूमीवर काश्मिरी पंडित या भेटीवेळी खूप भावूक झालेले दिसून आले. कलम ३७० बाबतच्या निर्णयामुळे समाधानी असलेल्या एका काश्मिरी पंडिताने मोदींच्या हाताचे चुंबन घेतले. तसेच ७ लाख काश्मिरी पंडितांच्यावतीने त्यांचे आभार मानले.
Howdy Modi : ...अन् नरेंद्र मोदी म्हणाले 'फिर एक बार, नमो नम:'!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2019 12:17 PM