रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर चीनने आपली मिसाईल डिफेन्स सिस्टिम युक्रेनपलिकडच्या युरोपमधील देशामध्ये पोहोच केली आहे. युरोप आणि अमेरिकेसह अन्य देश युक्रेन युद्धात व्यस्त असताना चीनने ही खेळी केली आहे. ही एक विमानविरोधी डिफेन्स सिस्टिम आहे, जीच्या उपस्थितीमुळे युरोपमध्ये तणावाचे वातावरण निर्माण होणार आहे.
सर्बिया हा दक्षिण पूर्व युरोपमधील एक चोहुबाजुंनी अन्य देशांनी वेढलेला देश आहे. महत्वाचे म्हणजे सर्बिया हा रशियाचा समर्थक आहे. यामुळे या देशात चीनची शस्त्रास्त्रे तैनात होणे हे चिंतेचे आहे. चीनने ही शस्त्रे गुपचूप पद्धतीने सर्बियाला पोहोच केली आहेत.
HQ-22 मिसाईल डिफेन्स सिस्टिम घेऊन चीनच्या हवाई दलाची मालवाहू विमाने बेलग्रेडच्या विमानतळावर उतरली. या विमानांमध्ये जमिनीवरून हवेत मारा करू शकणारी मिसाईल प्रणाली होती असा दावा करण्यात आला आहे. शस्त्रास्त्रांसह चिनी मालवाहक विमाने बेलग्रेडच्या निकोला टेस्ला विमानतळावर उतरल्याचे फोटो समोर आले आहेत.
वारजोन ऑनलाइन वृत्तपत्राने चीनची वाय-२० ही मालवाहू विमाने युरोपच्या आकाशात असल्याचे वृत्त दिले होते. याबाबत सर्बियाच्या संरक्षण मंत्रालयाने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. चीन आणि सर्बियाचे संबंध खुप जुने आहेत. गृहयुद्धावेळी देखील चीनने सर्बियाची मदत केली होती. सर्बियाचे अमेरिकेसोबत संबंध बिघडलेले आहेत.
काय आहे ही मिसाईल डिफेन्स सिस्टिम...HQ-22 क्षेपणास्त्र प्रणाली 170 किमीपर्यंत लक्ष्य नेस्तनाभूत करू शकते. या क्षेपणास्त्राचे वजन 300 किलो आणि लांबी सात मीटर आहे. HQ-22 हे चीनच्या जुन्या HQ-2 क्षेपणास्त्राचे अपग्रेडेशन आहे.