हाँगकाँग : जगातील मोठ्या बँकांमध्ये गणना असणारी एचएसबीसी बँक कर्मचारी कपात करणार आहे. जगभरातून तब्बल 10 हजार कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यात येणार आहे. 2015 मध्येही 50 हजार कर्मचाऱ्यांची कपात करण्यात आली होती.
बँकेचा खर्च कमी करण्यासाठी कर्मचारी कपास करण्यात येणार असून या महिन्याच्या शेवटी तिसऱ्या तिमाहीचा निकाल जाहीर झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात येणार आहे. यावेळी सामान्य स्तरावरील कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गंडांतर नसून मोठ्या पगाराच्या कर्मचाऱ्यांना नारळ देण्यात येणार आहे. ही माहिती अंतरिम मुख्य कार्यकारी अध्यक्ष नोएल क्यूईन यांनी दिली.
क्यूईन यांची नियुक्तीही अचानक झाली होती. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये जॉन फ्लिंट यांनी अचानक राजीनामा दिला होता. यानंतर पुढील वर्षी 4 हजार नोकऱ्या कमी होणार असल्याचे वृत्त होते. चीन आणि अमेरिकेदरम्यान गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेले व्यापार युद्ध याला कारणीभूत असल्याचे समजते. तसेच हाँगकाँगचा अस्थिर बाजार आणि ब्रेक्झिटही या कपातीसाठी कारणीभूत ठरले आहे.