अबुधाबी : संयुक्त अरब अमिरातीने (यूएई) मंगळ ग्रहावर जीवनासाठी पोषक वातावरण निर्माण करून तेथे मानवी वस्ती स्थापण्याच्या महत्त्वाकांक्षी योजनेवर काम सुरू केले आहे. शेख मोहंमद बिन राशीद अल मख्तुम यांनी दुबईत या आठवड्याच्या प्रारंभी ‘मार्स २2१७’ प्रकल्पाची घोषणा केली. हा प्रकल्प १०० वर्षांत पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.दुबईतील ५ व्या जागतिक सरकार शिखर परिषदेत या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची घोषणा करण्यात आली. यावेळी शेख म्हणाले की, ‘२११७ मार्स’ ही दीर्घकालीन योजना आहे. यात सुरुवातीला आमची विद्यापीठे आणि संशोधन संस्थांच्या विकासासाठी मदत केली जाईल. युवा पिढी वैज्ञानिक शोधाच्या प्रत्येक क्षेत्रात पारंगत व्हावी यासाठी ही मदत असेल. मार्स २११७ काय आहे?१०० वर्षांच्या या प्रकल्पांतर्गत वैज्ञानिक संशोधन केले जाणार असून, युवा पिढीचा अंतराळ विज्ञानाकडील कल वाढावा यासाठी विशेषत्वाने प्रयत्न करण्यात येणार आहेत. दुबईची पहिली अंतराळ मोहीम २०२१ मध्ये सुरू होईल. ही मोहीम यशस्वी झाल्यास अरब जगताचे अंतराळातील हे पहिले संशोधन असेल.मार्स २११७ या प्रकल्पात आंतरराष्ट्रीय पथकाचा समावेश करण्यापूर्वी यूएईचे शास्त्रज्ञ काम करतील. प्रारंभीच्या काळात मंगळावर अन्न आणि ऊर्जेच्या शक्यता तपासून पाहण्याचे काम करण्यात येणार आहे. त्यानंतर मंगळावर पोहोचण्याच्या आणि तेथून परतण्याच्या सर्वात वेगवान माध्यमांचाही (दळणवळणाचे साधन) शोध घेतला जाईल.२०१४ मध्ये स्थापन करण्यात आलेल्या आपल्या अंतराळ संघटनेवर युएईने आतापर्यंत ५.४ अब्ज डॉलर खर्च केले आहेत. युरोपच्या धर्तीवर या संघटनेला पॅन अरब अंतराळ संघटना बनविण्याचा प्रस्ताव आहे. मंगळ आणि भारतभारताने मंगळ मोहिमेअंतर्गत मंगळयान पाठविले होते. हे यान यावेळी पृथ्वीपासून २० कोटी कि.मी. अंतरावर असून, ठिकठाक आहे. ४५० कोटी रुपयांचे हे यान १५ महिन्यांपासून मंगळ ग्रहाला प्रदक्षिणा घालत असून, आणखी दहा वर्षे ते मंगळाचा अभ्यास करू शकते.
मंगळावर मानवी वसाहत
By admin | Published: February 20, 2017 1:05 AM