कराची : पाकिस्तानात शिया समुदायाला ‘लक्ष्य’ बनवून केल्या जाणाऱ्या हिंसाचाराला विरोध करणारे प्रमुख मानवाधिकार कार्यकर्ते खुर्रम जकी आणि त्यांचा पत्रकार मित्र राव खालीद यांची तालिबानींनी गोळ्या घालून हत्या केली. खुर्रम जकी धार्मिक कट्टरपंथीयांविरुद्ध आपल्या आक्रमक धोरणाने परिचित होते. शनिवारी रात्री ते न्यू कराची सेक्टर ११ मधील एका हॉटेलमध्ये जेवण करून परतत होते. त्याच वेळी दुचाकीवर आलेल्या चार हल्लेखोरांनी त्यांना गोळ्या घातल्या. या हल्ल्यात जवळच उभी असलेली अन्य एक व्यक्तीही जखमी झाली. जखमी झालेल्या दुसऱ्या इसमाचे नाव अस्लम आहे. अस्लम यांची प्रकृतीही गंभीर आहे. सिंधचे गृहमंत्री सुहेल अन्वर सियाल यांनी जकी यांच्या हत्येची चौकशी करून ४८ तासांत अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. वरिष्ठ पोलीस अधीक्षक मुकद्दस हैदर यांनी सांगितले की, ‘हल्लेखोरांनी जकी आणि खालीद यांना गोळ्या घातल्या. या गोळीबारात अस्लम हेही सापडले. जकी हे स्वत: माजी पत्रकार आहेत. ‘लेट्स बिल्ड पाकिस्तान’ नावाचे फेसबुक पेज त्यांनी सुरू केले होते, तेव्हापासून ते प्रसिद्धीस आले होते. मानवाधिकारांसाठी काम करणे आणि उदारवादी धार्मिक विचारांचा प्रसार करण्यासाठी समर्पित एका वेबसाइटचे ते संपादक बनले होते. त्यांनी कट्टरपंथाचा कडाडून विरोध केला होता.’ लाल मशिदीतील उलेमा मौलाना अब्दुल अजीज यांनी शिया मुस्लिमांविरुद्ध सुरू केलेल्या द्वेष भावनेला त्यांनी विरोध करून त्याविरुद्ध अभियान चालविले होते. त्यांनी आणि अन्य मानवाधिकार कार्यकर्त्यांनी दडपण आणल्यानेच अजीज यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
मानवाधिकार कार्यकर्त्याची पाकमध्ये हत्या
By admin | Published: May 09, 2016 3:18 AM