कराची : पाकिस्तानातील प्रमुख मानवाधिकार कार्यकर्त्या सबीन महमूद (४०) यांची कराची शहरात शुक्रवारी बंदूकधाऱ्यांनी गोळ्या घालून हत्या केली. सबीन यांनी बलुचिस्तानातील परिस्थितीवर परिसंवादाचे आयोजन केले होते. परिसंवाद आटोपून त्या आईसह घरी परत असताना दोन दुुचाकीस्वार बंदूकधाऱ्यांनी त्यांच्यावर हल्ला केला, अशी माहिती पोलिसांनी दिली.हल्ला झाला तेव्हा सबीन कार चालवत होत्या. त्यांना पाच गोळ्या लागल्या तर त्यांच्या शेजारी बसलेल्या त्यांच्या आईलाही गोळी लागली. सबीन यांना रुग्णालयात नेण्यात येत असताना रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला, असे पोलीस अधिकारी मुनीर शेख यांनी सांगितले. पोलीस घटनेचा सर्व कोनातून तपास करीत असून प्राथमिक चौकशीतून हत्येमागे वैयक्तिक शत्रुत्व असण्याचे संकेत मिळत आहेत, असेही ते म्हणाले. सबीन यांच्या शरीरातून पाच गोळ्या काढण्यात आल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यांच्या आईलाही गोळी लागली असून त्यांची प्रकृती गंभीर आहे, असे ‘डॉन’च्या वृत्तात म्हटले आहे. पंतप्रधान नवाज शरीफ यांनी सबीन यांच्या हत्येचा निषेध केला असून, चौकशीचे आदेश दिले आहेत. लष्कराचे प्रवक्ते असीम बाजवा म्हणाले की, आम्ही सबीन महमूद यांच्या या दु:खद आणि दुर्दैवी हत्येचा निषेध करतो. या हत्येमागे ज्यांचा हात असेल त्यांना पकडून न्यायालयासमोर हजर करण्यासाठी आम्ही पोलिसांना मदत करू. दरम्यान आंतरराष्ट्रीय स्तरावर या हत्येचा तीव्र निषेध होत आहे. (वृत्तसंस्था)
मानवाधिकार कार्यकर्त्या सबीन महमूद यांची हत्या
By admin | Published: April 26, 2015 1:46 AM