India helps Palestine: इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यातील युद्ध आणि वाद सध्या तरी शमण्याची चिन्हे दिसत नाहीयेत. या युद्धाबाबत भारताने वेळोवेळी आपली भूमिका स्पष्ट ठेवली आहे. मध्यपूर्वेतील हे युद्ध थांबवण्यासाठी भारताने 'द्वि-राष्ट्र' चर्चेचा प्रस्तावही ठेवला आहे. इस्रायल भारताचा मित्र आहे तसेच भारताचे पॅलेस्टाईनशीही मजबूत नाते आहे. यामुळेच भारताने पॅलेस्टाईनला कठीण काळात मदतीचा हात पुढे केला आहे. परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, भारताने पॅलेस्टाईनमधील युद्धग्रस्तांना वैद्यकीय मदत सामग्री पाठवली आहे. भारताने पॅलेस्टाईनला जीवनरक्षक आणि कर्करोगविरोधी औषधांसह ३० टन वैद्यकीय पुरवठा पाठवला आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी ट्विटरवरून पोस्ट करून ही माहिती दिली.
गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये युद्ध सुरू झाल्यापासून भारत गाझामध्ये राहणाऱ्या पॅलेस्टाइनच्या नागरिकांना मदत करण्यासाठी मदत साहित्य पाठवत आहे. गेल्या वर्षी भारताने पॅलेस्टाईनला $३५ मिलियनची आर्थिक मदत पाठवली होती. तर या वर्षी जुलैमध्ये भारताने संयुक्त राष्ट्र मदत आणि कार्य संस्था (UNRWA) ला $२५ दशलक्षचा पहिला हप्ता जारी केला होता.
याशिवाय, २२ ऑक्टोबर रोजी मोदी सरकारने पॅलेस्टाईनच्या मदतीसाठी ३० टन वैद्यकीय मदत सामग्री देखील पाठवली होती. ज्यात औषधे, शस्त्रक्रिया वस्तू, दंत उत्पादने, उच्च-ऊर्जा बिस्किटे आणि इतर अनेक आवश्यक वस्तूंचा समावेश होता. हे यूएन रिलीफ आणि गाझामधील पॅलेस्टाइनच्या निर्वासितांसाठी काम करणारी एजन्सी UNRWA द्वारे वितरित केले जात आहे.
भारताने पाठवलेली मदत सामग्री प्रथम इजिप्तला पाठवली जाते. तेथून राफा सीमेवरून हे सामान गाझामधील लोकांमध्ये वितरित करणाऱ्या यूएन एजन्सींना दिले जाते.