इराणचे परराष्ट्र मंत्री सध्या पाकिस्तान दौऱ्यावर आहेत. इस्रायलशी वाद, हल्ला करण्याची तयारी करत असलेल्या इराणने शेजारी देशांची साथ मिळविण्यासाठी मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे. पाकिस्तानसोबत इराणची १००० किमी लांबीची सीमा आहे. इस्रायलसोबत युद्ध भडकले तर त्या सीमेवर काही आगळीक होऊ नये, याची हमी घेण्यासाठी इराणने पाकिस्तानात आपल्या मंत्र्याला पाठविले आहे.
अशातच इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी पाकिस्तानचे लष्कर प्रमुख जनरल असीम मुनीर यांना भेटायला बोलविले होते. परंतू, लष्कराच्या सर्वोच्च गणवेशात असूनही इराणच्या गार्डनी त्यांना दरवाजावरच रोखून धरले. याचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने पाकिस्तानचा आंतरराष्ट्रीय अपमान झाला आहे. पाकिस्तानतच पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखांची काहीच इज्जत राहिली नाही, असे सोशल मीडियावर बोलले जाऊ लागले आहे.
इराणचे मंत्री अब्बास अराघची यांची पाकिस्तानी अधिकाऱ्यांसोबत बैठक होती. मुनीर यांनाही ही बैठक अटेंड करायची होती. परंतू, इराणच्या गार्डनी त्यांना आतमध्ये जाऊ दिले नाही. ही बाब लक्षात येताच पाकिस्तानी अधिकाऱ्यांची धावपळ उडाली. त्यांनी मुनीर यांची गार्डना ओळख करून दिली. यानंतर या गार्डनी मुनीर यांना आत सोडले.
इराण-पाकिस्तान सीमेवर दहशतवादी कारवाया वाढू लागल्या आहेत. यामुळे इराण इस्त्रायलसोबत लढत असताना या सीमेवर काही संकट निर्माण होऊ नये यासाठी पाकिस्तानची मदत घेण्याचा प्रयत्न करत आहे. काही महिन्यांपूर्वी इराणने पाकिस्तानी हद्दीत बॉम्बफेक केली होती. पाकिस्ताननेही इराणच्या हद्दीत हल्ले चढविले होते. यामुळे दोन्ही देशांत तणाव वाढला होता.
पाकिस्तानी सरकारपेक्षा सैन्याचीच जास्त चालते. यामुळे इराणचे परराष्ट्र मंत्री पाकिस्तानी लष्कर प्रमुखांना भेटण्यासाठी आले होते. अशात त्यांनाच रोखल्याने पाकिस्तानची पार इज्जत वेशीवर टांगली गेली आहे. याचा परिणाम या देशांच्या संबंधांवर होण्याची शक्यता आहे.