काबूल:अमेरिकी सैन्याने अफगाणिस्तान सोडल्यानंतर काही काळातचं तालिबानने सक्रीय होतं, अफगाणिस्तानातील बहुसंख्य शहरांचा ताबा घेतला. रविवारी अफगाणिस्तानात मोठ्या घडामोडी घडल्या. तालिबाननं अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये प्रवेश करुन राष्ट्रपती भवन आपल्या ताब्यात घेतलं. यानंतर अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अशरफ घनी यांच्यासह अनेक मोठे नेते देश सोडून गेले आहेत. त्याच वेळी, अफगाणिस्तानातील हजारो सामान्य नागरिकही काबूल सोडून इतर देशांमध्ये जाण्याचा प्रयत्न करत आहेत.
दरम्यान, अफगाणिस्तानातील एक व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होतोय. अनेक नागरिक तालिबानच्या जुलमी राजवटीत राहण्यापेक्षा देश सोडण्याचा विचार करत आहेत. काबूलमधून बाहेर जाणाऱ्या विमानांमध्ये बसण्यासाठी नागरिकांची झुंबंड उडाली आहे. व्हिडिओत शेकडोच्या संख्येने लोक एकाच विमानात चढण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. यादरम्यान विमानात चढण्याच्या पायऱ्यांवर चेंगरा-चेंगरी झालेली पाहायला मिळत आहे. कसही करुन या सर्वांना देश सोडून पळायचंय.
मिळालेल्या माहितीनुसार, हा व्हिडिओ काबूल विमानतळावरील आहे. व्हिडिओत विमानाला हजारो लोकांनी घेरलेलं दिसत आहे. तालिबानच्या प्रवक्त्यांनी देशातील नागरिकांना देश सोडू नये. त्यांच्या जीवाला, संपत्तीला हानी पोहोचवली जाणार नाही असं आवाहन केलंय. पण, तालिबानच्या जुन्या राजवटीचा अनुभव असल्यानं हजारो नागरिकांनी देश सोडण्याचा निर्णय घेतला आहे.अफगाणिस्तानातील हे दृष्य पाहून तेथील नागरिकांच्या मनातील भीतीचा फक्त अंदाजच आपल्याला लावता येऊ शकतो.