गॅबोरोने: आफ्रिका खंडातल्या बोट्सवानामध्ये साडे तीनशेहून अधिक हत्तींचे मृतदेह सापडले आहेत. या हत्तींचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. हत्तींचे मृत्यू जलस्त्रोतांजवळ झाले असल्याचं आढळून आलं आहे. पाण्याच्या माध्यमातून विष देऊन हत्तींचे मृत्यू घडवून आणले गेल्याचा संशय बळावला आहे. हत्तींच्या मृत्यूंचं कारण शोधण्यासाठी वैज्ञानिकांनीदेखील प्रयत्न सुरू केले आहेत. हत्तींच्या मृत्यूमागे एखादा आजार आहे का, याचा शोध घेतला जात आहे.बोट्सवाना सरकारनं अद्याप हत्तींच्या मृत्यूवर कोणतंही भाष्य केलेलं नाही. हत्तींना विष देऊन मारण्यात आल्याची एक घटना झिम्बाब्वेमध्ये समोर आली होती. हस्तीदंतांसाठी हे हत्याकांड घडवण्यात आलं होतं. त्यामुळे बोट्सवानामधील हत्तींच्या मृत्यूंवरून संशय निर्माण झाला आहे. याआधी कधीही एकाचवेळी इतक्या मोठ्या प्रमाणात हत्तींचा नैसर्गिक मृत्यू झाल्याची घटना पाहिली नसल्याचं राष्ट्रीय उद्यानातील वन्यजीव संवर्धन संचालक डॉ. नील मॅकेन यांनी म्हटलं. असे मृत्यू केवळ दुष्काळादरम्यान होतात आणि सध्याच्या घडीला पाणी उपलब्ध आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधलं. बोट्सवानातल्या ओकावांगो डेल्टा भागात आतापर्यंत ३५० हून अधिक हत्तींचा मृत्यू झाल्याची माहिती मॅकेन यांनी दिली. बोट्सवाना सरकारनं हत्तींच्या मृत्यूंबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही. मात्र सरकारनं हत्तींच्या मृत्यूचं कारणांचा तपास सुरू केला आहे. सरकारनं मृत हत्तींच्या चाचण्या केल्या आहेत. मात्र अद्याप या चाचण्यांचे अहवाल आलेले नाहीत. 'या प्रकरणी हवाई सर्वेक्षण करणाऱ्या पथकाला १६९ हत्तींचे मृतदेह आढळले आहेत. विविध पथकांना आढळून आलेल्या मृत हत्तींची एकूण संख्या ३५० हून अधिक आहे. विशेष म्हणजे या भागात इतर कोणत्याही प्राण्यांचे मृतदेह आढळून आलेले नाहीत,' अशी माहिती मॅकेन यांनी दिली.हत्तींच्या मृत्यूमागे एखादा आजारही असू शकतो, अशी शक्यता मॅकेन यांनी व्यक्त केली. 'हे प्रकरण अवैध शिकारीचं असतं, तर इतर प्राण्यांचे मृतदेहदेखील सापडले असते. मात्र तसं काही झालेलं नाही. पाण्यात विष मिसळून हत्तींची हत्या घडवून आणल्याची शक्यताही कमीच आहे. पाण्यात विष मिसळलं गेलं असतं, तर ते पाणी पिणाऱ्या इतरही प्राण्यांचे मृत्यू झाले असते. त्यामुळे हत्तींच्या मृत्यूंमागे एखादा आजार असावा,' अशी शक्यता त्यांनी बोलून दाखवली. बरेचसे हत्ती तोंडावर पडलेले दिसून येतात. त्यामुळे हा विषप्रयोग असण्याची शक्यता आहे. मात्र त्यांच्या चाचण्यांचे अहवाल आल्यावरच याबद्दलची माहिती मिळू शकेल, असंदेखील ते पुढे म्हणाले.
शेकडो हत्तींच्या संशयास्पद मृत्यूनं खळबळ, हत्याकांडाचा संशय; बोट्सवानातील फोटो व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 02, 2020 10:50 AM
साडे तीनशेपेक्षा अधिक हत्तींचा मृत्यू; हस्तिदंतासाठी हत्या झाल्याचा संशय
ठळक मुद्देमोठ्या प्रमाणात हत्तींचे मृतदेह आढळल्यानं खळबळहस्तिदंतासाठी हत्याकांड घडवल्याचा संशय; तपास सुरूसाडे तीनशे हत्तींचे मृतदेह सापडले; विषप्रयोग झाल्याची शक्यता