मेक्सिको सिटी, दि.10- श्रेणी 1 मध्ये मोडणारे फ्रॅंकलिन वादळ आज मेक्सिकोच्या किनाऱ्यावर येऊन धडकले. साधारण ताशी 85 मी वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांसह आलेले हे वादळ मध्य मेक्सिकोच्या डोंगराळ भागापर्यंत जाण्याची शक्यता आहे. या वादळामुळे पूर्वेकडील किनाऱ्यावर राहणाऱ्या लोकांना जोरदार पावसाचा आणि पुराचा तडाखा बसू शकतो असे नॅशनल हरिकेन सेंटरने स्पष्ट केले आहे. या वादळामुळे किनाऱ्यावरील लोकांनी खबरदारी म्हणून आपल्या वस्तू, वाहने, बोटी सुरक्षीत ठिकाणी हलवण्यास सुरुवात केली आहे.
फ्रॅंकलिन वादळ सकाळीच मेक्सीकोच्या युकाटन भागामध्ये थडकले. त्यामुळे या प्रदेशात जोरदार पाऊस आणि वेगवान वारे वाहू लागले आहे. हे वादळ हळूहळू पश्चिमेस सरकत आहे. जसजसे वादळ पश्चिमेला सरकेल तसे त्याची तीव्रता कमी होत जाईल अशी माहिती हरिकेन सेंटरने दिली आहे. तसेच या वादळामुळे 8 इंच ते 15 इंच पाऊस पडण्याची शक्यता असून यामुळे पुराचा धोका संभवत आहे.
या वादळामुळे किनारी प्रदेशामध्ये सहा फुट उंचीपर्यंत लाटा निर्माण होऊ शकतात त्यामुळे नागरिकांनी आपली संपत्ती आणि जीवाला वाचवण्यासाठी आधीपासूनच तयारी करावी असेही या केंद्राने सांगितले आहे. यामुळे मेक्सीकोच्या किनारी प्रदेशातील लोकांनी प्रापंचिक साहित्य तसेच बोटी, मासेमारीची जाळी तसेच इतर वस्तू सुरक्षीत नेण्यास प्रारंभ केला आहे. आतापर्यंत कोणत्याही प्रकारचे नुकसान झाल्याचे वृ्त्त आलेले नाही. फ्रॅंकलिन हे या हंगामातील पहिले चक्रीवादळ असून या वर्षी 19 निश्चित नावे असलेल्या वादळांपैकी बहुतेक वादळे अटलांटिकमध्ये येतील असे सांगण्यात येते. साधारणतः निश्चित नावे असलेल्या वादळांपैकी 11 ते 17 वादळे या हंगामामध्ये येतील असा अंदाज आहे. 2017 चा चक्रीवादळ हंगाम 1 जूनला सुरु झाला, तो 30 नोव्हेंबररोजी संपेल. या वादळाआधी खबरदारीमुळे मेक्सीको सरकारने क्विंटाना रु प्रांताच्या मध्य, पूर्व, दक्षिण भागामध्ये रेड अलर्ट, युकाटनमध्ये आणि कॅंपेशे प्रांताच्या उत्तर, पूर्व, मध्य भागात ऑरेंज अलर्ट तसेच टॅबास्को प्रांताच्या पूर्व भागात यलो अलर्ट जारी केला आहे.