न्यू ऑरलियन्स : 'इडा' चक्रीवादळ रविवारी (दि.29) अमेरिकेच्या लुईझियाना किनाऱ्यावर ग्रँड आयल बेटाजवळ धडकले. यावेळी वारे 241 किमी प्रति तास वेगाने वाहत होते. 'इडा' चक्रीवादळ हे अमेरिकेतील सर्वात शक्तिशाली वादळांपैकी एक असल्याचे म्हटले जात आहे.
'इडा' चक्रीवादळच्या जोरदार वाऱ्यामुळे लुईझियाना क्लिनिकचे छप्पर उडाले आहे. तसेच, अनेक ठिकाणी घरांचे नुकसान झाले आहे. वादळामुळे विविध ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत. मात्र, यामुळे अद्याप कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे समजते. दरम्यान, 'इडा' चक्रीवादळाचा पुढील वेग मंदावला आहे. त्यामुळे मुसळधार पाऊस आणि वादळी वारे वाहतील. तर अनेक ठिकाणी पूर येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
विशेष म्हणजे, 16 वर्षांपूर्वी याच तारखेला लुईझियाना आणि मिसिसिपीमध्ये 'कॅटरिना' या चक्रीवादळाने कहर केला होता. याशिवाय, अमेरिकेत कोरोना रुग्ण वाढीचा धोका असूनही आपत्कालीन सेवेचे अधिकारी इडा चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात गुंतले आहेत.