लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: महिला हक्कासाठी अनेक गट आणि सामाजिक चळवळींचा उदय होऊनही महिलांची जगातील लैंगिक समानतेच्या दिशेने होणारी प्रगती खुंटली आहे, असे संयुक्त राष्ट्रांच्या अहवालात दिसून आले आहे. अहवालानुसार, जवळपास ९० टक्के पुरुष किंवा १० पैकी नऊ पुरुष महिलांना किमान एकदा तरी दुय्यम वागणूक देत आहे. पतीने पत्नीला मारहाण करणे बरोबरच असल्याचे जगभरातील ८० देशांतील २५ टक्के लोकांनी मत व्यक्त केले आहे.
अहवाल कुणाचा?
यूएन डेव्हलपमेंट प्रोग्रामने जेंडर सोशल नॉर्म्स इंडेक्स २०२३ हा अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालात १० वर्षांतील झालेल्या महिला अधिकार आणि त्यांच्या प्रगतीबाबत भाष्य करण्यात आले आहे.
जागतिक मोहिमा काय कामाच्या?
२०१० ते २०२२ दरम्यानच्या ८० देशांमधून गोळा केलेल्या वर्ल्ड व्हॅल्यूज सर्व्हेमधील डेटा वापरून तयार केलेल्या अहवालानुसार, महिलांच्या हक्कांसाठी जगभरात अनेक जागतिक व स्थानिक मोहिमा राबवूनही महिलांबाबत पक्षपातीपणा करण्याच्या मानसिकतेत कोणताही बदल झालेला नाही.
लिंग समानता होणार?
- २०३० पर्यंत लिंग समानतेचे उद्दिष्ट संयुक्त राष्ट्रसंघाने ठेवले आहे.
- सांस्कृतिक पक्षपातीपणा आणि दबाव महिलांच्या सक्षमीकरणात मोठे अडथळे ठरत आहेत.
लैंगिक समानता कुठे वाढली?
- जर्मनी
- उरुग्वे
- न्यूझीलंड
- सिंगापूर
- जपान
कुठे कमी?
- चिली
- द. कोरिया
- मेक्सिको
- रशिया
- इराक
महिलांबाबत जगात भारत...
- लैंगिक समानता - १२२ वा क्रमांक
- माता मृत्यू प्रमाण- १ लाख मातांमागे १३३
- १५ ते १९ वयातील मुलींनी बाळाला जन्म देणे- १७.२%
- लोकसभेत जागा- १३.४%
- १२ वी पर्यंतचे शिक्षण- ४२%
- कामगार- १९.२%
भारतात काय स्थिती?
- भारतातील ९९.२% लोक किमान एकदा तरी महिलांबाबत पक्षपातीपणा करतात. केवळ ०.७८ टक्के लोक महिलांना दुय्यम वागणूक देत नाहीत. ६९% लोकांना राजकारणात महिला नको आहेत.
- शिक्षणात ३८८.५० तर अर्थव्यवस्थेमध्ये ७५% जण महिलांबाबत पक्षपातीपणा करतात. मानसिक स्वास्थ्य, बाळाला जन्माला घालावे की नाही याबाबत ९२.३९% जण महिलांचे मत विचारात घेत नाहीत.
- २७% महिलांना वाटते की लोकशाहीसाठी पुरुषांसारखे अधिकार महिलांनाही असावेत.
- ४९% लोकांना वाटते की महिलांपेक्षा पुरुषच अधिक चांगले राजकारणी असतात.
- २८% लोकांना वाटते की महिलांपेक्षा पुरुषांसाठी विद्यापीठातील शिक्षण महत्त्वाचे आहे.
- ४६% जणांना वाटते की महिलांपेक्षा पुरुषांना नोकरीचा अधिक अधिकार आहे.
- ४३% जणांना वाटते की महिलांपेक्षा पुरुष अधिक चांगला व्यवसाय करतील.
महिलांमध्ये पक्षपातीपणा कुठे?
- राजकारण ६५.१%
- शिक्षण ३१.२%
- अर्थव्यवस्था ६४.७%
- मानसिक स्वास्थ्य ७६.२%