मॉस्को - रशियामध्ये संतापाच्या भरात पतीने कु-हाडीचा वार करुन पत्नीचे हात कापल्याची घटना घडली आहे. धक्कादायक म्हणजे, पत्नीच्या मोबाइलवर दुस-या व्यक्तीने पाठवलेले मेसेज पाहिल्याने त्याचा संताप झाला, आणि या क्षुल्लक कारणावरुन त्याने पत्नीवर हल्ला करत तिचे हात कापले. मेसेज पाठवणा-या व्यक्तीला त्याची पत्नी आवडत होती. महिलेने या घटनेआधी त्याच्या धमक्या आणि मारहाणीला कंटाळून घटस्फोट मागितला होता. नेहमी होत असणा-या भांडणांमुळे दोघे वेगळे राहत होते. हल्ला केल्यानंतर पती तिला घेऊन रुग्णालयात गेला. डॉक्टरांनी उपचार करत एक हात पुन्हा बसवण्यात यश मिळवलं. पण दुसरा हात ते वाचवू शकले नाहीत.
25 वर्षीय मार्गरिटा दोन मुलांची आई आहे. तिचा पती ड्मित्री ग्राचयोवा एक मानसशास्त्रज्ञ आहे. फक्त आणि फक्त इर्षेपोटी त्याने हा हल्ला केला. हल्ल्यात मार्गरिटाच्या बोटाला आणि खांद्याला जबर जखमा झाल्या आहेत. 'मी त्याच्याकडे घटस्फोट मागितला होता. यामुळेच त्याचा प्रचंड संताप झाला होता', असं त्यांनी सांगितलं आहे. झालेल्या घटनेबद्दल सागंणं आपल्यासाठी खूपच वेदना देणारं असल्याचं त्या वारंवार सांगत होत्या.
पोलिसांनी आरोपी पती ड्मित्री ग्राचयोवाला अटक केली आहे. त्याला फेब्रुवारी महिन्यापर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे. केलेल्या गुन्ह्यासाठी त्याला 15 वर्षांच्या कारावासाची शिक्षा होऊ शकते. पोलिसांनी केलेल्या चौकशीत त्याने कबूल केलं आहे की, 'मुलांना शाळेत सोडल्यानंतर आपण पत्नीला घेऊन जंगलात गेलो होतो. तिथेच कु-हाडीने हल्ला करत तिचे हात कापले'.
पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने आधी कु-हाड पकडण्याच्या बाजूने पत्नीची बोटं ठेचून काढली आणि नंतर दोन्ही हात कापले. हल्ल्यानंतर पत्नीला रुग्णालयात दाखल केलं आणि स्वत:ला पोलिसांच्या हवाली केलं. याआधीही आरोपी पतीने घटस्फोटाचा विचार सोडून दे सांगत चाकूने हल्ला केला होता. आरोपीने चेह-यावर अॅसिड फेकण्याची धमकीही दिली होती.