वॉशिंग्टन: इतर काही देशांसह भारतही हायपरसोनिक क्षेपणास्त्र तयार करत असल्याची माहिती समोर आली आहे. अमेरिकन संसदेच्या एका स्वतंत्र अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. अमेरिकन संसदेचा हा अहवाल अशा वेळी आला आहे जेव्हा नुकत्याच प्रसारमाध्यमांच्या अहवालात दावा करण्यात आलाय की, चीनने हायपरसोनिक क्षेपणास्त्र प्रक्षेपित केलं आहे. चीनच्या या चाचणीने अमेरिकन गुप्तचर संस्थांना चकित केलं आहे.
सध्याअमेरिका, रशिया आणि चीनकडे हायपरसोनिक शस्त्रे आहेत. परंतु ऑस्ट्रेलिया, भारत, फ्रान्स, जर्मनी आणि जपानसह काही इतर देशही हायपरसोनिक शस्त्रे विकसित करत आहेत, असे स्वतंत्र काँग्रेसनल रिसर्च सर्व्हिस(सीआरएस) ने आपल्या अहवालात म्हटले आहे. सीआरएसने आपल्या अहवालात म्हटल्यानुसार, ऑस्ट्रेलिया, अमेरिका आणि भारत यांनी या संदर्भात रशियाशी करार केला आहे. भारताने रशियासोबत मॅक 7 हायपरसोनिक क्षेपणास्त्र ब्रह्मोस 2 विकसित करण्यासाठी करार केला आहे.
अहवालात पुढे म्हटले आहे की, 2017 मध्ये ब्रह्मोस 2 तयार करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले होते. पण, यात थोडा उशीर झाल्याचे दिसत आहे. आता 2025 ते 2028 दरम्यान हे क्षेपणास्त्र तयार होऊ शखते. भारत त्याच्या हायपरसॉनिक टेक्नॉलॉजी डेमॉन्स्ट्रेटर व्हेईकल प्रोग्राम अंतर्गत स्वदेशी, दुहेरी-सक्षम हायपरसोनिक क्रूझ क्षेपणास्त्र विकसित करत आहे आणि जून 2019 ते सप्टेंबर 2020 दरम्यान मॅक 6 स्क्रॅमजेटची यशस्वी चाचणी केली होती, अशी माहितीही अहवालात देण्यात आली आहे.
चीनने ऑगस्टमध्ये आण्विक क्षेपणास्त्राची चाचणी केली
अमेरिकन तज्ज्ञांनी तयार केलेल्या संसदेच्या अहवालात म्हटले आहे की, भारताकडे सध्या 12 हायपरसोनिक पवन बोगदे आहेत आणि मॅक 13 पर्यंतच्या गतीची चाचणी करण्यास ते सक्षम आहे. याशिवाय, फायनान्शियल टाइम्सच्या बातमीनुसार, चीनने ऑगस्टमध्ये अणु-क्षेपणास्त्राची चाचणी केली होती. अमेरिकन गुप्तचर संस्थांनाही या चाचणीमुळे आश्चर्य वाटले आहे.