इस्लामाबाद: पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पुन्हा एकदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर निशाणा साधलाय. मागील दोन दिवसात त्यांनी दुसऱ्यांदा आरएसएवरविरोधात वक्तव्य केलंय. तसंच, पाक ऑक्युपाइड काश्मीर (PoK) मध्ये निवडणूक रॅलीदरम्यान त्यांनी स्वतःला सर्व काश्मीरींचा ब्रँड अॅम्बेसिडर म्हटले.
16 जुलै रोजी उज्बेकिस्तानमध्ये झालेल्या सेंट्रल साउथ एशिया कॉन्फ्रेंसमध्ये इम्रान खान आले होते. त्यावेळी एएनआय या वृत्तसंस्थेने भारताकडून त्यांना प्रश्न विचारला होता की, दहशतवाद आणि चर्चा एकाचवेळी होऊ शकते का ? या प्रश्नाला उत्तर देताना इम्रान खान म्हणाले की, "आम्ही अनेक दिवसांपासून वाट पाहत आहोत की, भारत आणि पाकिस्तानमध्ये मैत्रीपूर्ण संबंध तयार व्हावेत. दोन्ही देश सभ्य शेजाऱ्यासारखे राहावेत. पण, करणार काय ? RSS ची विचारधारा आडवी येते...' यानंतर त्यांना तालिबानवर तुमचा कंट्रोल नाही का ? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर इम्रान यांनी उत्तर देणं टाळलं.
संघाची विचारधारा भारतासाठी धोकादायकत्यानंतर इम्रान खान 17 जुलै रोजी PoK च्या बाघमध्ये निवडणूक रॅलीसाठी गेले होते. तेव्हा परत एकदा त्यांनी संघावर निशाणा साधला. ते म्हणाले, 'भाजपा आणि संघाची विचारधारा भारतासाठी खूप धोकादायक आहे. भाजपा-संघाची विचारधारा फक्त मुस्लिमांनाच टार्गेट करत नाही, तर शिख, खिश्चन आणि दलितांनाही टार्गेट करते. संघाला या सर्व समाजातील लोकांना बरोबर येऊ द्यायंच नाहीये.'
370 वरुन मोदींवर निशाणायावेळी इम्रान खान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या काश्मीरमधून कलम 370 हटवण्याच्या निर्णयाची निंदा केली. 5 ऑगस्ट 2019 नंतर काश्मीरमध्ये अत्याचार वाढला, असा आरोप इम्रान यांनी केला. तसेच, त्यांनी स्वतःला सर्व काश्मीरींचा ब्रांड अॅम्बेसडरदेखील म्हटले.
काश्मीरमध्ये पूर्वीप्रमाणे परिस्थिती व्हावी...यापूर्वी जुन महिन्यात इम्रान यांनी भारत-पाकिस्तान चर्चेवर भाष्य केले होते. भारताने काश्मीरमध्ये पूर्वीप्रमाणे परिस्थिती आणवी. कलम 370 रद्द करण्याच्या निर्णयाला सरकारने मागे घ्यावे, यानंतर भारत-पाकिस्तानमध्ये चर्चे होऊ शकते, असे ते म्हणाले होते. तर, 24 जून रोजी मोदींनी काश्मीरी नेत्यांसोबत बैठक घेतली होती. त्या बैठकीतही काश्मीरी नेत्यांनी हाच मुद्दा उपस्थित केला होता.