कराची : पाकिस्तानच्या संसदेमध्ये शनिवारी पंतप्रधान इम्रान खान यांच्या नावाची शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी शिफारस करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. मात्र, सोमवारी इम्रान यांनीच ट्विटरवर नोबेल पुरस्कारासाठी पात्र नसल्याचे म्हटले आहे.
पुलवामा हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानदरम्यान उद्भवलेली युद्धसदृष्य स्थिती आणि भारताचे विंग कमांडर अभिनंदन यांची सुटका यामुळे इम्रान खान यांना शांततेचा नोबेल पुरस्कार देण्याची मागणी पाक संसदेमध्ये करण्यात आली होती. माहिती मंत्री फवाद चौधरी यांनी याबाबतचा प्रस्ताव मांडला होता.
इम्रान खान यांचे ट्विट अशा वेळी आले आहे, जेव्हा पाकिस्तानी संसदेमध्ये दोन्ही सभागृहात आज चर्चा होणार आहे. या प्रस्तावामध्ये भारतीय हवाई दलाचे पाकिस्तानने पकडलेले विंग कमांडर अभिनंदन यांची सुटका करण्याचा निर्णय तातडीने घेण्यात आला. यामुळे युद्धाची परिस्थिती बदलली आणि पाकिस्तानने शांततेच्या दृष्टीने पुढे पाऊल टाकले. इम्रान यांनी घेतलेली जबाबदारी ही नोबेल पुरस्कारासाठी पात्र आहे.