लंडन : जम्मू आणि काश्मीर येथे राहणाऱ्या पत्रकार आणि कार्यकर्त्या याना मीर यांनी नुकतीच ब्रिटनला भेट दिली. यावेळी त्यांनी ब्रिटनच्या संसदेत भाषण करून पाकिस्तानचे तोंड बंद केल्यानंतर उपस्थित लोकांनी जोरदार टाळ्या वाजवल्या.
आपल्या भाषणात याना म्हणाल्या की, मी मलाला युसूफझाई नाही, कारण मी स्वतंत्र आहे आणि मी माझ्या भारत देशात, मातृभूमी काश्मीरमध्ये सुरक्षित आहे. माझ्या मातृभूमीपासून पळून जाऊन तुमच्या देशात (ब्रिटन) आश्रय घेण्याची गरज नाही. मी मलाला युसूफझाई कधीच होणार नाही. पण, मलाला युसूफझाईने माझ्या देशाची, माझ्या पुरोगामी मातृभूमीला अत्याचारित म्हणून बदनाम केल्याबद्दल मला आक्षेप आहे, असे याना म्हणाल्या.
भारतीय समाजाचे ध्रुवीकरण करणे थांबवा. हजारो काश्मिरी मातांनी या दहशतवादाच्या गर्तेत आपले पुत्र गमावले आहेत. माझ्या काश्मिरी समाजाला शांततेत जगू द्या. जय हिंद, असे यानाने म्हटले आहे.
भारतीय लष्कराचे कौतुक
यानाने ब्रिटनच्या संसदेत भारतीय लष्कराचे कौतुक केले. याना म्हणाली की, भारतीय लष्कर जम्मू-काश्मीरमध्ये चांगले काम करत आहे. याना यांनी कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या सकारात्मक बदलांचेही कौतुक केले.