पाच महिन्यांपूर्वी मी एलॉन मस्क यांच्या तेराव्या मुलाला जन्म दिला आहे, असा दावा MAGAच्या समर्थक लेखिका असलेल्या एश्ली सेंट क्लेयर यांनी केला आहे. त्यांनी एक्सवर लिहिले की, पाच महिन्यांपूर्वी मी एका मुलाला जन्म दिला आहे. त्याचे वडील एलॉन मस्क आहेत. आतापर्यंत या बाळाची सुरक्षा आणि खाजगीपणासाठी ही बाब लपवून ठेवण्यात आली होती. मात्र आता प्रसारमाध्यमे ही बाब उघड करणार आहेत.
एश्ली सेंट क्लेयर यांनी प्रसारमाध्यमांना आवाहन केलं की, त्यांच्या बाळाच्या खाजगीपणाचा सन्मान ठेवण्यात यावा. तसेच या प्रकरणात कुठलीही ढवळाढवळ कऱण्याचा प्रयत्न करू नये. दरम्यान, या दाव्यावर एलॉन मस्क यांनी थेट प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र आणखी एका बाळाला जन्म देणं, एक छोटंस लक्ष्य आहे, या एक्सवर एका युझरने दिलेल्या प्रतिक्रियेवर एक हसरी इमोजी पोस्ट केली आहे.
दरम्यान, एश्ली सेंट क्लेयर मागच्या वर्षभरापासून न्यूयॉर्कमधील मॅनहॅटनमधील एका महागड्या अपार्टमेंटमध्ये राहत आहे. त्याचं मासिक भाडं सुमारे १२ ते १५ हजार डॉलर महिना म्हणजेच मासिक १० ते १२ लाख रुपये एवढं आहे. त्यांच्या आपार्टमेंटमधील रहिवाशांनी सांगितले की, या इमारतीमध्ये टेस्ला साइबर्ट्रक खरेदी करणारी ती सुरुवातीच्या काही लोकांपैकी एक होती.
एश्ली सेंट क्लेयर यांनी सुरक्षेसाठी रिंग डोरबेल कॅमेरा लावला आह. तसेच इमारतीमध्ये सुरक्षेची आधीपासूनच कडेकोट व्यवस्था आहे. त्या इमारतीमधील कर्मचाऱ्यांशी फार कमी बोलतात. तसेच त्यांच्या दरवाजाबाहेर डिलिव्हरी पॅकेज तसेत पडलेले असतात. दरम्यान, एलॉन मस्क यांच्या या कथित बाळाचा सांभाळ करण्यासाठी एक आया ठेवण्यात आली आहे.
जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती असलेल्या एलॉन मस्क यांना आधीच जस्टिन विल्सन, ग्रिम्स आणि शिवोन जिलिस या तीन महिलांपासून १२ मुलं आहेत. आता एश्ली सेंट क्लेअर यांचं कथित बाळ हे मस्क यांचं तेरावं बाळ आहे.